फरशीवर गाद्या टाकून गरोदर माता ॲडमिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 04:39 PM2020-10-05T16:39:20+5:302020-10-05T16:39:58+5:30
आरोग्य विभागाच्या स्त्री रुग्णालयाकडे येणाऱ्या गरोदर मातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खाटा अपूऱ्या पडत असून गरोदर मातांना चक्क फरशीवर गाद्या टाकून अॅडमिट करून घेतले जात आहे.
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील स्त्री रुग्णालय विभाग कोविड रुग्णांसाठी असल्याने आरोग्य विभागाच्या स्त्री रुग्णालयाकडे येणाऱ्या गरोदर मातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खाटा अपूऱ्या पडत असून गरोदर मातांना चक्क फरशीवर गाद्या टाकून अॅडमिट करून घेतले जात आहे.
गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून स्त्री रुग्णालय गरोदर मातांनी हाऊसफुल्ल झाले आहे. खाटा शिल्लक नसल्याने आणि गर्दी वाढल्याने फिजिकल डिस्टंन्सिंगचा पार बोऱ्या वाजला आहे. यामुळे ताण वाढल्याने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोग्य उपसंचालकांसह जिल्हा शल्य चिकित्सकांकडे धाव घेतली होती. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र पाठवून डिलिव्हरीचे केसेस रेफर करू नये, अशी विनंती केली होती. परंतु, तरीही गरोदर मातांचे येणे सुरूच आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे बाभळगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात ३० बेडची सोय आहे. नॉर्मल डिलिव्हरीच्या केसेस या रुग्णालयाकडे पाठवून शहरातील स्त्री रुग्णालयाचा ताण कमी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी सांगितले..
स्त्री रुग्णालयातील वाढता भार लक्षात घेता रूग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून दिले आहे. एनआरएचएम अभियानांतर्गत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या ड्युटी स्त्री रुग्णालयात लावण्यात आल्या आहेत. शिवाय, निलंगा, अहमदपूर, उदगीर, मुरुड, औसा येथे नॉर्मल डिलिव्हरीसह सिझेरियनची सोय आहे. या रुग्णालयाकडून प्रसुतीसाठी केसेस रेफर होऊ नयेत, अशाही सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्या आहेत.