'एमबीबीएस' ला प्रवेश मिळाला, पण डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न करताच मुलीने स्वतःला संपवले
By राजकुमार जोंधळे | Published: January 17, 2023 08:04 PM2023-01-17T20:04:31+5:302023-01-17T20:07:05+5:30
औरंगाबादच्या मुलीची लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या
लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थीनीने वसतिगृहातील खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. साक्षी राजेंद्र गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात सायंकाळी आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औरंगाबाद येथील साक्षी राजेंद्र गायकवाड (वय २१) ही लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षामध्ये सध्या शिक्षण घेत हाेती. दरम्यान, ती महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या वसतिगृहात वास्तव्याला हाेती. मंगळवारी सकाळी ८.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास साक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या राहत्या खाेलीत साडीने फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. आतून दार बंद असल्याने बाहेरून मैत्रिणींनी दार वाजविले. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाला देण्यात आली. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी दार ताेडून पाहिले तर साक्षीने आत्महत्या केल्याचे समाेर आले.
याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे, सहायक पाेलिस निरीक्षक एस. एम. काेल्हे, उमाकांत पवार, पंडित केंद्र यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रुग्णालयातील डाॅक्टरने दिलेल्या माहितीवरून गांधी चाैक पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.