12 दिवसांनंतर लातूरचा आडत बाजार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 05:46 PM2018-09-07T17:46:10+5:302018-09-07T17:46:33+5:30
लातूर : ऐन सणासुदीच्या कालावधीत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी शेतमालाची खरेदी बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. शुक्रवारी सकाळी सभापती ललितभाई शहा यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत खरेदीदारांची समजूत काढण्यात आली. व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने शेतीमालाचे व्यवहार सुरु झाले.
प्रस्तावित हमीभावाच्या कायद्यास विरोध दर्शवित राज्यातील बाजार समित्यांतील खरेदीदारांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीही गेल्या अकरा दिवसांपासून बंद होती. परिणामी, शेतीमालाची खरेदी- विक्री ठप्प झाली होती. बैलपोळा, गौरी- गणपती असे सण तोंडावर आले असताना शेतमाल विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. दरम्यान, ही कोंडी दूर करण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्नही झाले. शुक्रवारी सकाळी सभापती ललितभाई शहा यांच्या पुढाकाराने खरेदीदार, आडत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी खरेदीदारांना सध्याच्या कायद्याबद्दल माहिती देण्यात येऊन समजूत काढण्यात आली. खरेदीदारांनी सकारात्मकता दर्शविल्याने शेतमालाच्या व्यवहारास सुरुवात झाली.
पणन मंत्र्यांच्या बैठकीत प्रश्न मांडा
शेतकऱ्यांची सध्या अडचण होत आहे. पणनमंत्र्यांनी खरेदीदारांची बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत खरेदीदारांनी आपल्या समस्या मांडाव्यात. तोपर्यंत बाजारपेठ सुरु करावी. त्या बैठकीनंतर निर्णय घ्यावा, अशी समजूत काढल्याने आडत बाजार सुरु झाल्याचे ललितभाई शहा यांनी सांगितले.