24 तास उलटल्यानंतरही अविनाश चव्हाणांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 11:41 AM2018-06-26T11:41:25+5:302018-06-26T11:42:33+5:30
‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
लातूर- ‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर 24 तास उलटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. आधी त्यांच्या मारेक-यांना पकडा, मगच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
अविनाश चव्हाण (वय ३६) यांनी शिक्षकांची नेमणूक करून स्टेप बाय स्टेप हा कोचिंग क्लास लातूर येथे सुरू केला होता. दरम्यान, रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ते आपल्या साईधाम येथील घराकडे कारने एकटेच निघाले होते. अगदी घराच्या जवळ महसूल कॉलनीतील शाळेजवळ रस्त्यावरच अज्ञात मारेक-यांनी त्यांना गाठले व दोन गोळ्या झाडल्या. पहिला वार निकामी गेला. मात्र दुसरी गोळी अविनाश चव्हाण यांच्या छातीत घुसली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़शिवाजी राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, उपाधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला़ त्यानंतर अविनाश चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सर्वोपचार रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. कोचिंग क्लास चालविणा-या संचालकाचा गोळ्या झाडून खून झाल्याचे वृत्त जिल्हाभरात वा-यासारखे पसरले़ दक्षता म्हणून उद्योग भवन परिसर, सर्वोपचार रुग्णालय येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे़ तसेच खबरदारी म्हणून सोमवार व मंगळवारी खासगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.