शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

By हरी मोकाशे | Published: September 4, 2023 07:35 PM2023-09-04T19:35:09+5:302023-09-04T19:35:23+5:30

जलसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज

After a month-long hiatus, rain appearance in Latur district has dashed farmers' hopes | शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

googlenewsNext

लातूर : तब्बल महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पावसाने पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्वदूर व दमदार पावसाची गरज आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०१ मिमी पाऊस झाला आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दरम्यान, पिकांपुरता रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिके चांगली बहरली होती. मात्र, जुलैअखेरपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीनची फुलगळती झाली. शिवाय, वाढही खुंटली. दरम्यान, पावसाने ताण कायम ठेवल्याने हलक्या व मध्यम जमिनीवरील करपून गेली, तर चांगल्या जमिनीवरील पिकांना शेतकऱ्यांनी पाणी दिल्याने तग धरून राहिली. मात्र, सोयाबीनच्या अपेक्षित उत्पादनात जवळपास ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

तब्बल महिनाभरानंतर जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा उंचावल्या आहेत. खरिपातील सोयाबीनला फटका बसला असला तरी किमान पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, अशी आशा आहे. त्यामुळे दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस...

तालुका - २४ तासांतील पाऊस - आतापर्यंतचा पाऊस
लातूर - २०.४ - ३३५.३

औसा - १७.४ - २५१.२
अहमदपूर - १३.५ - ३५१.०

निलंगा - १६.२ - ३४१.७
उदगीर - ८.९ - ४८३.४

चाकूर - २२.० - ३१२.६
रेणापूर - ११.७ - २८०.९

देवणी - १२.४ - ५२८.६
शिरुर अनं.- २४.३ - ३८४.०

जळकोट - ९.९ - ४२४.४
एकूण - १६.१ - ३५९.३

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण...

दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत थंड गारवा जाणवत होता. जिल्ह्यातील येरोळ, देवणी, निटूर, खरोसासह काही भागात मध्यम व रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. मात्र, विहिरी, तलावातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची अद्यापही गरज आहे. त्यामुळे पावसाकडे नजरा लागून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २२१ मिमीची तूट...
गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८०.५ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २२१.२ मिमी पावसाची तूट आहे. जुलैअखेरपासून पावसाने ताण दिल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

Web Title: After a month-long hiatus, rain appearance in Latur district has dashed farmers' hopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.