सलग २४ तास नृत्यानंतर आता १२६ तासांच्या विश्वविक्रमासाठी सृष्टी जगताप सज्ज
By संदीप शिंदे | Published: May 20, 2023 08:30 PM2023-05-20T20:30:32+5:302023-05-20T20:35:02+5:30
नेपाळच्या नावावरील विक्रम मोडणार; गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी लातूरची सृष्टी जगताप सज्ज
लातूर : सलग २४ तास लावणी नृत्याचा विक्रम करीत आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली लातूरची सृष्टी सुधीर जगताप ही अकरावी वर्गातील विद्यार्थींनी येणाऱ्या २९ मे ते ३ जुन दरम्यान सलग १२६ तासांपेक्षा अधिक काळ नृत्य करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेपाळच्या नावावर असणारा विश्वविक्रम मोडणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या सोहळ्यात सृष्टीच्या अनमोल भेटीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
सृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कल्चरल ऑलम्पियाडसाठी भारताचे नेतृत्व केले होते. त्यासाठी ती हाँगकाँग आणि दुबई येथील उत्सवात सहभागी झाली होती. यापुर्वी सृष्टीने राज्य आणि देशपातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. वाहिन्यांवरील नृत्य स्पर्धांमध्ये महाविजेतेपद पटकाविले आहे. ती सध्या दयानंद महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून, दहावीत सीबीएसई ९९.२ टक्क्यांसह ती उत्तीर्ण झाली आहे. तिला युपीएससी स्पर्धांमधून सनदी सेवेत जायचे आहे. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वोत्कृष्ट नृत्य कौशल्य असलेल्या सृष्टीच्या कुटूंबियांनी तिला भक्कम साथ दिली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, तिच्या नृत्य विश्वविक्रमाचे परिक्षण गिनिज बुक यंत्रणेकडून होणार आहे. दरम्यान, तिला दयानंद संस्थेने सहा दिवसांसाठी सभागृह विनामुल्य उपलब्ध करुन दिले आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प. सीईओ अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले असून, तिच्या विश्वविक्रमाला २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल.
नेपाळच्या नावावरील विक्रम मोडणार...
सलग पाच दिवस नृत्याचा रेकॉर्ड नेपाळ देशाच्या नावावर आहे. त्यापुर्वी भारतातील सोनी चौरसिया यांच्या नावावर ही नोंद होती. आता सृष्टी पुन्हा हा विश्वविक्रम भारताच्या नावावर नोंदविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी लातूरच्या दयानंद सभागृहात २९ मे ते ३ जुन या कालावधीत पाच दिवस १२६ तासांपेक्षा अधिक वेळ नृत्य करुन नेपाळचा रेकॉर्ड मोडणार असल्याचे सृष्टीने सांगितले.