गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

By हरी मोकाशे | Published: June 23, 2023 04:55 PM2023-06-23T16:55:30+5:302023-06-23T16:56:12+5:30

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची धास्ती वाढली होती.

After eight months of waiting, 92 teachers became head masters! | गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

googlenewsNext

लातूर : मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा लागून होती. त्यामुळे वारंवार चौकशी करण्यात येत होती. अखेर जवळपास ८ महिन्यांनी पदोन्नतीस मुहुर्त सापडला आणि शुक्रवारी ९२ शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. समुपदेशनाने या नूतन मुख्याध्यापकांना शाळा देण्यात आली. त्यामुळे गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार २७६ शाळा आहेत. या शाळांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मुख्याध्यापक पदासाठीच्या पदोन्नतीसाठीचा कालावधी पूर्ण झाला होता. त्यामुळे त्यांना पदोन्नतीचे वेध लागले होते. विशेष म्हणजे, गत मे महिन्यात जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या झाल्या होत्या. या बदल्यावेळी पदोन्नतीचे प्रक्रिया पार पडेल, अशी आशा होती. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची धास्ती वाढली होती.

दरम्यान, शुक्रवारी जिल्हा परिषदेत पदोन्नती प्रक्रिया होऊन समुपदेशन पध्दतीने शाळा निश्चित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांच्यासह गटशिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पदोन्नतीसाठी ८ महिन्यांचा विलंब...
जिल्हा परिषदेत शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया सन २०२१ मध्ये झाली होती. तद्नंतर गत सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया पार पडणे अपेक्षित होते. मात्र, ऑनलाईन बदली प्रक्रियेत रिक्त पदांची स्थिती बदलल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली होती. अखेर जवळपास ८ महिन्यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली आहे.

तात्काळ पदोन्नतीचे आदेश...
मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या ९२ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीस काही दिवसांचा उशीर झाला आहे. पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तात्काळ आदेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

Web Title: After eight months of waiting, 92 teachers became head masters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.