शिक्षक वडिलांची भेट ठरली अखरेची; मुलीने हॉस्टेलवर जाऊन संपवले जीवन
By राजकुमार जोंधळे | Updated: March 21, 2024 19:45 IST2024-03-21T19:45:41+5:302024-03-21T19:45:56+5:30
बीड जिल्ह्यातील वकीलवाडी (ता. केज) येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने आपल्या १७ वर्षीय मुलीला खाजगी शिकवणीसाठी लातुरातील एका वसतिगृहात ठेवले हाेते.

शिक्षक वडिलांची भेट ठरली अखरेची; मुलीने हॉस्टेलवर जाऊन संपवले जीवन
लातूर : इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि खाजगी शिकवणीसाठी लातुरात हाॅस्टेलमध्ये वास्तव्याला असलेल्या एका अल्पवयीन मुलीने वडिलांच्या भेटीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, बीड जिल्ह्यातील वकीलवाडी (ता. केज) येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने आपल्या १७ वर्षीय मुलीला खाजगी शिकवणीसाठी लातुरातील एका वसतिगृहात ठेवले हाेते. दरम्यान, रविवारी सुटी असल्याने तिला भेटण्यासाठी ते लातुरात आले हाेते. मुलीला भेटून ते लातुरातील नातेवाइकांना भेटून येताे, असे मुलीला सांगत बाहेर पडले. वडील वसतिगृहाबाहेर पडल्यानंतर मुलीने राहत्या खाेलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.
गावाकडे जाण्यापूर्वी मुलीला पुन्हा एकदा भेटून जावे, म्हणून ते रात्री उशिरा वसतिगृहावर आले. तिच्या खाेलीचे दार वाजविले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आतून दरवाजा लावून घेतल्याचे लक्षात आले. काही वेळानंतर खाेलीचा दरवाजा ताेडून काढला असता, मुलीने छताला गळफास घेतल्याचे आढळून आले. तिला तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी तपासून तिला मृत घाेषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
..