मोबदला दिल्यानंतर महामार्गाचे काम सुरु करा; पानगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:05 PM2018-12-28T17:05:47+5:302018-12-28T17:06:29+5:30
शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्यावतीने पानगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
रेणापूर ( लातूर) : लातूर ते पानगावपर्यंतच्या महामार्गाचे काम सुरू असून ते काम रेणापूर फाट्यापर्यंत आले आहे़ यापुढील काम सुरु होत आहे़ पानगाव फाटा (खरोळा फाटा) ते पानगावपर्यंतच्या रस्त्यासाठी भूसंपादन करुन त्याचा मावेजा द्यावा़ त्याशिवाय, काम सुरु करु नये, या मागणीसाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी पानगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले़ यात विमलताई अकनगिरे, धनाजी भंडारे, पडिले, लिंबराज एलाले, नारायण वंगाटे, सुभाष जाधव, काकासाहेब कापसे, सूर्यकांत मोटेगावकर, परमेश्वर बरुळे, अजय चव्हाण, ज्ञानोबा कोंपल, बब्रुवान इस्ताळकर, विठ्ठल डोणे, काशिनाथ इस्ताळकर, जब्बार शेख, मनसूद शेख, शिवराज यादव, जयप्रकाश जटाळ, अभय येलाले, नागेराव जाधव आदी सहभागी झाले होते़
पानगाव फाटा (खरोळा फाटा) ते पानगावपर्यंतच्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला आहे़ लातूरपासून या रस्त्याचे काम सुरू होऊन रेणापूर फाट्यापर्यंत काम झाले आहे़ मात्र पानगाव फाटा (खरोळा फाटा) ते पानगावपर्यंत होणाऱ्या महामार्गासाठी भूसंपादन झाले नाही़ त्यामुळे महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याचे शुल्क महामार्ग विभागाने भरुन मोजणी करावी़ महामार्ग होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा़ शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला़
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे़
पानगाव फाटा येथे दोन तास आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन घेण्यासाठी तालुका प्रशासन व पोलिसांनी प्रयत्न केला़ परंतु, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी येऊन लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला़