तुळशी विवाहानंतर वाजणार सनई चौघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:40 PM2019-11-04T13:40:57+5:302019-11-04T13:43:33+5:30
वधू-वर पित्यांची मंगल कार्यालय बुकिंगसाठी लगबग
- निशिकांत मायी
लातूर : दोन मनांचे मिलन घडविणारा आणि दोन कुटुंबांना जोडणारा विवाह संस्कार सोहळा समीप आला असून तुळशी विवाहानंतर लातुरात सनई-चौघडे मोठ्या प्रमाणात वाजणार आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यातच तब्बल ११ विवाह मुहूर्त असून शहरातील मंगल कार्यालये सज्ज झाली आहेत.
येत्या ९ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार असून १२ नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे. साधारणपणे तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासूनच विवाहांना सुरुवात केली जाते. त्यानुषंगाने ११ नोव्हेंबरला लग्नाचा पहिला बार फुटणार आहे. लातूर शहरात लग्नाचे वय झालेल्या मुलामुलींच्या लग्नघरी त्या दृष्टीने तयारी पूर्णत्वाकडे आली असून मंगल कार्यालयेही दुमदुमणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली होती. मात्र यावर्षी तसे काही नाही. यंदा झालेला दमदार पाऊस विवाह सोहळ्याच्या आनंदात भर टाकणारा आहे. नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे चार मुहूर्त असून शहरातील अनेक मंगल कार्यालयांचे बुकिंग आधीच करण्यात आले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने मिळून ११ शुभ मुहूर्त फुल्ल असल्याचे मंगल कार्यालयातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक गावात मंगल कार्यालयांची निकड असून अनेकांनी आपल्या घराच्या अंगण परिसरातच मंडप टाकून विवाह सोहळा उरकण्याचे ठरविले आहे. सामान्य कुटुंबातील पालकांची लग्न जुळलेल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी मंगल कार्यालयांची बुकिंग करण्यासाठी लगबग वाढली आहे.
असे आहेत विवाहाचे मुहूर्त
नोव्हेंबर : २०, २१, २३, २८़ डिसेंबर : १, २, ३, ६, ८, ११, १२़ जानेवारी : १८, २०, २९, ३०, ३१़ फेब्रुवारी : १, ४, १२, १४, १६, २०, २७, मार्च : ३, ४, ८, ११, १२, १९़ एप्रिल : १५, १६, २६, २७़ मे : २, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४, जून : ११, १४, १५़ पुढील वर्षी २०२० च्या मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये बुकिंगसाठी आतापासूनच धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मार्च-एप्रिलची वाढली बुकिंग
लातूर शहरात सद्यपरिस्थितीत २५ ते ३० मंगल कार्यालये असून ६ ते ७ लॉन आहेत. लातूरची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. अशावेळी २५ ते ३० मंगल कार्यालये आणि ६-७ लॉन म्हणजे शहरासाठी कमीच ठरतात. पुढील वर्षात लग्नाचे अधिक मुहूर्त असल्याने मार्च, एप्रिल, मे महिन्यासाठी आतापासूनच बुकिंगसाठी प्रयत्न केले जात आहेत. आधी मंगल कार्यालये बुक केली जाऊन जी तारीख बुक केली तीच लग्नाची तारीख ठरविली जात आहे.
विवाह मुहूर्त पाळा...
विवाह मुहूतार्साठी केवळ तारखेला महत्त्व नाही तर त्या दिवशीचा अग्नी महत्त्वाचा असतो. मंगल नामाने त्या दिवसाची सुरुवात होत असते. मात्र अनेकदा लग्न वेळेवर लागत नाहीत, असे लक्षात आले आहे. शुभ वेळ पाहूनच मुहूर्त काढलेला असतो. घटिका ही महत्त्वाची असते. शास्त्रात मुहूतार्चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पत्रिकेवर लग्नाची जी वेळ दिली आहे, ती प्रत्येकाने पाळावी, असे साई मंदिरचे पुजारी नागेश जोशी यांनी सांगितले.