राशी झाल्यानंतर शेतमाल थेट बाजारात; लातूरात सोयाबीनची विक्रमी आवक
By हरी मोकाशे | Published: November 4, 2023 07:03 PM2023-11-04T19:03:35+5:302023-11-04T19:04:05+5:30
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी ११ हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता.
लातूर : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनच्या पिकाच्या राशी होताच शेतकरी थेट शेतमालाला बाजारपेठ दाखवित आहेत. त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. शनिवारी ५२ हजार ३४७ क्विंटल अशी आवक झाली. दरम्यान, आवक वाढूनही दर मात्र स्थिर राहिल्याचे पहावयास मिळाले.
जिल्ह्यात सोयाबीनवर प्रक्रिया करणारे मोठमोठे उद्योग असल्याने येथे सोयाबीन मोठी आवक होते. खरीपात ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र, फुल- फळ धारणेच्या कालावधीत पावसाने ताण दिला आहे. तसेच येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांची घट झाली. तीन आठवड्यांपासून शेतकरी सोयाबीनच्या राशी करीत आहेत. आर्थिक अडचणींतील शेतकरी हाती चार पैसे असावेत म्हणून सोयाबीन थेट बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.
एका दिवसात आवक दुप्पट
मागील १५ दिवसांपासून बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरू होती. मात्र, ती २० हजार क्विंटलच्या जवळपास होती. शुक्रवारी आवक वाढून २९ हजार ४३६ क्विंटल झाली, तर शनिवारी जवळपास दुप्पट आवक झाली. दिवसभरात ५२ हजार ३४७ क्विंटल झाली. त्यामुळे आडत बाजारात जिकडे- तिकडे सोयाबीनचे कट्टे दिसून येत आहेत.
सर्वसाधारण दर ४ हजार ७७० रुपये
शनिवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर घसरतील की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र, दर स्थिर राहिल्याने बळीराजास काहीसा दिलासा मिळाला. कमाल भाव ४ हजार ८५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. किमान ४ हजार ७०० रुपये तर सर्वसाधारण दर ४ हजार ७७० रुपये मिळाला. शुक्रवारी कमाल भाव ४ हजार ८४५, किमान ४६०० तर सर्वसाधारण ४ हजार ७६० रुपये राहिला होता.
किमान दरात शंभर रुपयांची वाढ
आवक वाढली की दर घसरतात, असा शेतकऱ्यांना नेहमीचा अनुभव आहे. शनिवारी आवक दुप्पट होऊनही किमान दरात शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराजवळ रांगाच रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मापतोल करणे सुरू होते.
गेल्या वर्षीचेही सोयाबीन बाजारात
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी ११ हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता. मात्र, गत हंगामात कमी दर असल्याने आगामी चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केली नाही. परंतु, सतत भाव घसरत असल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.
व्यापाऱ्यांना सूचना
कुठल्याही शेतकऱ्याची अडचण होऊ नये याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी. वेळेवर मापतोल करावेत. दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने शेतमालाची पट्टी विनाविलंब द्यावी, अशा सूचना व्यापाऱ्यांना केल्या आहेत.
- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.