खुनानंतर मृतदेह नदीपात्रात; तक्रारदारच निघाला आरोपी, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
By राजकुमार जोंधळे | Published: November 21, 2022 07:39 PM2022-11-21T19:39:35+5:302022-11-21T19:40:07+5:30
खुनानंतर मृतदेह नदीपात्रात घटनेची तक्रारदार करणारा व्यक्तीच निघाला आरोपी.
लातूर: पत्नीसोबत अनैतिक संबंध अन् फोनवर बोलत असल्याच्या संशायावरुन चाकूने वार करुन एकाचा खून केल्याची घटना लातुरातील बाभळगाव नाका परिसरात घडली. दरम्यान, पोलिसांचा संशय तक्रारदारावरच बळावल्याने त्याला चौकशीला घेतले होते. अधिक चौकशीनंतर खुनाचे बिंग फुटले. तक्रारदारच आरोपी निघाला असून अटक केली आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, सुग्रीव अप्पाराव कांबळे (३२, रा. ब्रम्हवाडी ता. चाकूर) आणि राम कुमदाळे (रा. आटोळा ता. चाकूर) यांनी टेम्पो घेतला होता. त्याचा हिशोब आणि राम कुमदाळे हा आपल्या पत्नीशी सतत फोनवरुन बोलतोय या संशयावरुन सुग्रीव कांबळे याने त्याच टेम्पोच्या केबीनमध्ये बाभळगाव नाका परिसरात रिंगरोडलगत तोंडावर, पोटावर चाकूने सपासप वार करुन खून केला. खुनानंतर मृतदेह एका चादरीत बांधून, त्यात दगड टाकून चामेवाडी-शिवणी शिवारातील मांजरा नदीपात्रात फेकून दिले. पुरावा नष्ट कराण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर सुग्रीव अप्पाराव कांबळे यानेच विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
फिर्यादीवरच संशयाची सुई...
घटनेचा तपास करताना, फिर्यादीवर पोलिसांचा संशय अधिक बळावला. संशयाची सुई सुग्रीव अप्पाराव कांबळे यांच्यावरच असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेत खाक्या दाखविला. दरम्यान, घडलेले कथानक सांगितले आणि गुन्ह्याची कबुलीही दिली असून, त्यास पोलिसांनी अटक केली.
अखेर खुनाचा गुन्हा दाखल...अधिक चौकशीनंतर खुनाचे बिंग फुटले असून, याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात सुग्रीव अप्पाराव कांबळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी.बी. खंदारे करत आहेत.