जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी

By हणमंत गायकवाड | Published: May 17, 2024 01:01 PM2024-05-17T13:01:15+5:302024-05-17T13:02:49+5:30

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत.

After the order of the Collector, Latur Municipal Council woke up; JCB on Unauthorized Hoarding | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी

लातूर: शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले असून मुंबई येथील दुर्घटनेनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाला जाग आली आहे. शहरात जेसीबीद्वारे होर्डिंग काढण्याच्या कारवाईला बुधवारी दुपारनंतर प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आठ ते दहा अनधिकृत होर्डिंग करण्यात आले होते. दरम्यान, होर्डिंगमधून तीन एजन्सींकडून एप्रिल २०१९ ते मार्च २०२३ पर्यंत १९ लाख ५७ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत. विशेष दोघा-तिघांचा अपवादवगळता अनेकांनी अधिकृत शुल्कही भरलेले नाही. याकडे मनपाचे दुर्लक्ष कसे राहिले, हा प्रश्न आहे. अनधिकृत होल्डिंग लावण्यास कोणाचे अभय आहे. या बाबीची चौकशी होण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून अनधिकृत होर्डिंग राजरोसपणे कसे लावण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनाधिकृत होर्डिंग लावण्याला कोणाचे अभय? चौकशीची मागणी
वादळी वारे आणि अवकाळी पाऊस शहरावर घोंगावत आहे. अशावेळी मान्सूनपूर्व कामे करणे अपेक्षित असते. मात्र, मान्सूनपूर्व कामे राहिले बाजूला. अनधिकृत कामाचा ताण मनपात आहे. चिरीमिरीमुळे अनधिकृत कामे वाढतात,असा आरोप राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. कोणाच्या सांगण्यावरून अनधिकृत होर्डिंग लावले? त्यावर मनपाने कारवाई का केली नाही? कारवाई करण्याकडे डोळेझाक का केली? त्याला कोण जबाबदार ? याची चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात राष्ट्रवादीने केली आहे.

मान्सूनपूर्व कामाकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष..
दरवर्षी शहरातील प्रभाग क्र ३,४,५ आणि लातूर शहरातील पूर्वभाग व सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरात आणि झोपडट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते, रस्त्यांवर पाणी साचते, नाले तुंबतात. पावसाळ्यातील वादळी वाऱ्यांमुळे धोकादायक झाडे, फलक उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी तुंबणाऱ्या भागाची पाहणी करून पाण्याचा निचरा करणे. रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, चेंबर्स साफ करणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र विभाग उभारण्याबाबत काही निर्णय घेणे. पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर काही उपाययोजना आखणे, मान्सूनपूर्व उपाययोजनांशी संबंधित सर्व कामे प्राधान्याने करणे या कामाकडे महानगरपालिका प्रशासनाचे सध्या तरी दुर्लक्ष दिसत आहे.

Web Title: After the order of the Collector, Latur Municipal Council woke up; JCB on Unauthorized Hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.