लातुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, विविध ठिकाणी रस्ता रोको 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 06:43 PM2023-10-30T18:43:17+5:302023-10-30T18:44:01+5:30

खबरदारी म्हणून दुसऱ्या दिवशीही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या.

Aggressive protestors for Maratha reservation in Latur, blocked road at various places | लातुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, विविध ठिकाणी रस्ता रोको 

लातुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, विविध ठिकाणी रस्ता रोको 

- आशपाक पठाण

लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन, मंत्री, आमदारांच्या फलकाला काळे फासणे, लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सोमवारी आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. दरम्यान, खबरदारी म्हणून दुसऱ्या दिवशीही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या.

लातूर तालुक्यातील अनेक गावांत मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी लातूर ते मुरूड मार्गावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुरूड अकोला, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साखरा पाटी, टाकळगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुरूड अकोला येथील आंदोलनामुळे सकाळी बार्शी रोडवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होता. महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने समाजबांधवांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारण्यात आले. तसेच लातूर तालुक्यातील नागझरी येथे लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. शिराळा येथे राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या फलकांना काळे फासण्यात आले. जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. तसेच रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकीवर जाऊन बसलेल्या महिला २८ तासानंतरही खाली उतरल्या नाहीत. मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश माकोडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतही महिला मागण्यांवर ठाम होत्या.

बससेवा बंद, खाजगीकडून लूट...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रविवारी दुपारी १ वाजेपासून बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या सूचनेनुसार खबरदारी म्हणून महामंडळाने ही भुमिका घेतली आहे. मात्र, बसेस बंद असल्याचा गैरफायदा खाजगी वाहन चालकांकडून घेतला जात आहे. ५० किलोमीटर अंतरासाठी रात्री काही वाहनधारकांनी २०० ते ३०० रूपये घेतल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. बसस्थानकासमोर वाहने उभी करून प्रवासी भरले जात आहेत. त्यांच्या तिकिटदरावर नियंत्रण कोणाचे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Aggressive protestors for Maratha reservation in Latur, blocked road at various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.