सरकारी शाळा, नोकर भरती कंत्राटीकरणाच्या विरोधात आंदोलन
By आशपाक पठाण | Published: September 26, 2023 07:43 PM2023-09-26T19:43:58+5:302023-09-26T19:45:32+5:30
समनक जनता पार्टीकडून लातूर-कळंब रोडवर रस्ता रोको, वाहतूक ठप्प
आशपाक पठाण, लातूर : सरकारी शाळांचे खासगीकरण व सरकारी नोकर भरती कंत्राटीकरणाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी समनक जनता पार्टीच्या वतीने लातूर -कळंब रोडवर काटगाव येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष जयसिंग जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
सरकारी नोकरभरती खाजगी कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून केल्या जात आहे. हा निर्णय शासनाने तत्काळ रद्द करावा. अन्यथा समनक जनता पार्टी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करील. असा इशारा जिल्हाध्यक्ष जाधव यांनी यावेळी दिला. राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरूणांची संख्या आहे, त्यांच्या हाताला रोजगार नाही, शिक्षणाचे खाजगीकरण केल्यास सर्वसामान्यांच्या मुलांनी शिकायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होईल. शाळांचे खाजगीकरण तसेच खाजगी कंपनीमार्फत होणारी नोकर भरती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या धाेरणाविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी ॲड. संतोष पवार, शरद राठोड, दयानंद राठोड, बालाजी जाधव, सुनील पवार, महादेव जाधव, अक्षय चव्हाण, बळीराम जाधव, एल.टी. चव्हाण, सुरेश राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.