मंडप, डेकोरेटर, मंगल सेवा असोसिएशनचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 06:12 PM2020-11-02T18:12:15+5:302020-11-02T18:28:47+5:30
कोरोनाच्या संकटामुळे मंडप डेकोरेटर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
लातूर : सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालये, हॉलच्या क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांच्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी लातूर जिल्हा मंडप डेकोरेटर, मंगल सेवा असोसिएशनच्य वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाथ आकनगिरे, ज्ञानेश्वर भागवत, गणेश आकनगिरे, रोहन मेहता, आनंद राठी, राम समसापुरे, शैलेश रेड्डी, भागवत नारारे, सत्तार शेख, जयदेव बिडवे, भीमाशंकर खानापुरे, किरण येल्लूरकर, किरण कुलकर्णी, आदींसह मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोरोनामुळे व्यवसायावर आर्थिक संकट आले आहे. टेंट, मंडप, मंगल कार्यालये, लॉन्स, लाईट डेकोरेशन या संबंधित जीएसटी १८ टक्केऐवजी ५ टक्के करावा, पीएफ भूगतानमध्ये सवलत द्यावी, सर्व टेंट, मंडप व्यवसाय धारकांना उद्योगाचा दर्जा दिला जावा, बँकांकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे, व्यावसायिकांना कमर्शिअल हाऊस टॅक्स, वॉटर टॅक्स, कचरा निवारण आदी टॅक्समधून सूट देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. सदरील मागण्यांचे निवेदन असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
उद्योगाचा दर्जा द्यावा...
कोरोनाच्या संकटामुळे मंडप डेकोरेटर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे मंडप व्यवसाय, मंगल सेवा आदींना उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, ज्यामुळे बँकांकडून तात्काळ कर्ज उपलब्ध होईल. तसेच जीएसटीमध्ये सवलत देण्यात यावी, ५०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.