अहमदपूर तहसीलसमोर उपोषणकर्त्या दाम्पत्याने रचले सरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:20 PM2018-12-10T17:20:39+5:302018-12-10T17:22:58+5:30
उजना येथील सुरेखा कासले व बलभीम कासले यांच्या जागेवर अन्य व्यक्तीने अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले आहे़
अहमदपूर (लातूर ) : तालुक्यातील उजना येथील एकाच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्याने अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे़ हे अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलसमोर शनिवारपासून दाम्पत्याचे उपोषण सुरु होते़ याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी अखेर सोमवारी सरण रचले़ हे पाहून अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले़
अहमदपूर तालुक्यातील उजना येथील सुरेखा कासले व बलभीम कासले यांच्या जागेवर अन्य व्यक्तीने अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले आहे़ त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी केली होती़ त्यास महिनाभराचा कालावधी उलटला असतानाही कुठलीही कारवाई केली जात नसल्याने अखेर कासले दाम्पत्याने शनिवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले़ दोन दिवस उलटले तरी प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे पाहून सोमवारी बलभीम कासले यांनी गाडीभर लाकडे मागवून सरण रचले आणि त्यावर झोपले़ हे पाहून अधिकाऱ्यांची धावपळ उडाली़ या प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़
दोघांची तात्पुरती वेतनवाढ रोखली
या प्रकरणास पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवकास जबाबदार धरुन त्यांची तात्पुरती वेतनवाढ रोखण्यात आली असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांनी सांगितले़