शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली
By हरी मोकाशे | Published: February 2, 2024 07:02 PM2024-02-02T19:02:03+5:302024-02-02T19:02:28+5:30
लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण
लातूर : पैशासाठी शेतकऱ्यांची होणारी धावाधाव थांबावी आणि आर्थिक गरज तत्काळ भागावी म्हणून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दहा तालुके असून एकूण ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यापैकी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील प्रमुख बाजारपेठांपैकी आहे. जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची बाजारपेठ म्हणून उदगीरची ओळखली जाते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बाजार समिती आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. परिणामी, सोयाबीनचे दर उतरले आहेत. हमीभाव ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, सध्या सर्वसाधारण भाव ४ हजार ४५० रुपये, कमाल ४ हजार ५८१ तर किमान ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी शेतमाल तारण योजनेचा आधार घेत आहेत.
साडेपाच कोटींचे कर्ज वितरण...
बाजार समिती - कर्ज रक्कम
लातूर - ३ कोटी ४३ लाख
औसा - ६ लाख ९३ हजार
उदगीर - १ कोटी ७५ लाख
चाकूर - २४ लाख १० हजार
एकूण - ५ कोटी ४९ लाख
तीन बाजार समित्यांची आर्थिक स्थिती नाजूक...
शेतकऱ्यांना आर्थिक गरजेवेळी मदत व्हावी म्हणून शासनाने गेल्या काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ११ पैकी तीन बाजार समित्यांची आर्थिक स्थिती नाजूक असून गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन बाजार समित्यांनी ही योजना राबविली नाही.
निधी उपलब्ध परंतु, प्रस्ताव दाखल नाहीत...
जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, अहमदपूर आणि औराद शहाजानी येथील बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद करून ठेवली आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याचा प्रस्ताव कर्जासाठी दाखल झाला नाही. त्यामुळे एक रुपयाचेही कर्ज वितरण झाले नाही.
लातूर बाजार समितीकडून सर्वाधिक कर्ज पुरवठा...
लातूर बाजार समितीने २२० शेतकऱ्यांना ९ हजार ९४४ क्विंटल शेतमालापाेटी ३ कोटी ४३ लाख ८ हजार ७२ रुपयांचे वाटप झाले. औसा बाजार समितीकडून ५० शेतकऱ्यांना २ हजार २१० क्विंटल सोयाबीनपोटी ६ लाख ९३ हजार ६०० रुपये, उदगीरात १२८ शेतकऱ्यांना ५ हजार ८५ क्विंटल शेतमालापोटी १ कोटी ७५ लाख ३६ हजार ९०० रुपये, तर चाकूर बाजार समितीने १५ शेतकऱ्यांना ७११ क्विंटल सोयाबीनपोटी २४ लाख १० हजार ५०० रुपयांचे वितरण केले आहे.
शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण उपयुक्त...
शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ८ बाजार समित्यांकडून ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना पतपुरवठा होत आहे. चार बाजार समित्यांकडून जवळपास साडेपाच कोटींचे कर्ज वितरण झाले आहे.
- संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक.