अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक ७६७६ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:42+5:302021-05-19T04:19:42+5:30
अहमदपूर : मागील आठ दिवसांपासून बंद असलेल्या अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोनच दिवसांत २ हजार ४५५ क्विंटल ...
अहमदपूर : मागील आठ दिवसांपासून बंद असलेल्या अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोनच दिवसांत २ हजार ४५५ क्विंटल आवक झाली. दरम्यान, सोयाबीनला सर्वाधिक ७ हजार ६७६ रुपये प्रतिक्विंटल तर भुईमुगास ७ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. त्यामुळे सोयाबीन आणि भुईमुगाची आवक आणखीन वाढण्याची आशा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ८ ते १६ मेपर्यंत अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. मागील दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली. त्यात सोयाबीनला विक्रमी ७ हजार ६७६ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. जवळपास ३३६ क्विंटलची आवक झाली होती तसेच किमान भाव ६ हजार ५०० रुपये असा राहिला.
हरभऱ्याची आवक ३३९ क्विंटल होऊन कमाल भाव ४ हजार ८००, भुईमुगाची आवक ९९३ क्विंटल होऊन कमाल भाव ७ हजार ७६६ तर सर्वसाधारण भाव ४ हजार, हायब्रीडची २०० क्विंटल आवक होऊन २ हजार १०० रुपये असा कमाल भाव मिळाला. दोन दिवसांत एकूण २ हजार ४५५ क्विंटल शेतमालाची आवक झाली.
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी बाजारात धान्य विक्री करून बियाण्यांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील नव्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. सौदा निघताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हिंगणे, आडत व्यापारी संतोष कोटगिरे, दिलीप जाधव, मनोहर गोरटे, सुहास बावचकर, सचिव राजकुमार भुतडा उपस्थित होते.
बाजार समितीत लसीकरण करावे...
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकरी येत आहेत. जवळपास २१८ हमाल- मापाडी, १०० गुमास्ता व ८५ व्यापारी आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेगडे यांनी केल्याचे सांगितले.