वेटलिफ्टिंगमध्ये 'आकाश'ची वजनदार कामगिरी; अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:18 PM2023-03-17T16:18:22+5:302023-03-17T16:18:49+5:30
वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात आकाशच्या रूपाने नांदेड विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
- महेश पाळणे
लातूर : उत्कृष्ट लिफ्टिंग व स्नॅचचे वजनदार प्रदर्शन करीत लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंड याने मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत २३४ किलो वजन उचलत सुवर्णकिमया साधली आहे.
लातूर शहरातील दयानंद कला महाविद्यालयात एम. ए. प्रथम वर्षात शिकणाऱ्या आकाश गौंडने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करीत सुवर्णपदक पटकाविले आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत त्याने स्नॅच प्रकारात १०३ किलो, तर तीन ॲन्ड जर्क प्रकारात १३२ किलो असे एकूण २३५ किलो वजन उचलत स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. वेटलिफ्टिंग खेळात त्याने या स्पर्धेत जबरदस्त लिफ्टिंग करीत व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूंपेक्षा अधिक वजन उचलत ही सुवर्ण किमया केली आहे. त्यास प्रशिक्षक नीलेश जाधव, शुभम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. विठलसिंह परिहार, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, डॉ. पी. एन. देशमुख, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अशोक वाघमारे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
विद्यापीठ स्थापनेनंतर या खेळात प्रथमच सुवर्णपदक...
वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात आकाशच्या रूपाने नांदेड विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य व कांस्यपदक पटकाविले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेत आकाशने सुवर्णझेप घेत नवा उच्चांक स्थापीत केला आहे.
राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही किमया...
आकाशने यंदाच्या वर्षात पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्यपदक पटकाविले होते. यासह संघटनेतर्फे आयोजित खुल्या गटातील स्पर्धेत त्याने कांस्यही मिळविले होते. मात्र, विद्यापीठ स्पर्धेच्या माध्यमातून त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
ट्रेनरच्या माध्यमातून खुरकाचा खर्च...
घरची परिस्थिती साधारण असल्याने कॉलेज करीत आकाश एका जिमवर ट्रेनर म्हणून काम करतो. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून तो आपला खुराकाचा खर्च भागवतो. कुस्ती खेळाप्रमाणेच वेटलिफ्टिंगलाही खुराकाची गरज असते. जिमच्या मिळणाऱ्या मानधनातून तो आपला डायटचा खर्च भागवत त्याने यशोशिखर गाठले आहे.