अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्रात बोंब मारो आंदोलन
By हणमंत गायकवाड | Published: March 13, 2024 05:01 PM2024-03-13T17:01:37+5:302024-03-13T17:01:55+5:30
विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत.
लातूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर नजीक पेठ येथील उपकेंद्रात विविध मागण्यांसाठी बुधवारी बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत. पुनर्मूल्यांकनाचा निकाल लवकर लावून ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत किंवा जे विद्यार्थी पास होत आहेत, अशा विद्यार्थ्यांचे घेतलेले शुल्क परत करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर सहमंत्री नरेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ उपकेंद्र परिसरात हे आंदोलन झालं. या आंदोलनात सुशांत एकुर्गे, प्रणव सागर, प्रसाद हलकंचे, भागवत बिरादार, यश आर्वीकर, सागर वाडीकर, दीपक यादव, राजेश सोमासे, रवी माळी, योगेश कोलबुदे, वैष्णवी शिंदे, वैष्णवी शितोळे, तेजूमई राऊत, अभिजित बोरोळे, राम जाधव, ऋषिकेश कदम, अक्षय स्वामी, ओमकार पोद्दार, स्नेहल जाधव, अजय ठाकूर यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
वेळेवर परीक्षा घेऊन वेळेत निकाल द्यावा
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल देणे अपेक्षित आहे; परंतु निकाल कधीच वेळेत लागत नाही त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख तसेच मूल्यांकन करण्याची तारीख एकच येते. परीक्षा संपली तरी मूल्यांकनाचा निकाल लागत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या बाबीचा विचार करून वेळेत निकाल आणि वेळेत परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी अविपवाच्या वतीने यावेळी करण्यात आली.