गुजरातमधील महिलांच्या चित्रफिती व्हायरल प्रकरणातील चारही आराेपींना आठ दिवसांची काेठडी
By राजकुमार जोंधळे | Updated: February 22, 2025 22:18 IST2025-02-22T22:16:16+5:302025-02-22T22:18:49+5:30
सांगली जिल्ह्यातील तीन आणि प्रयागराज येथील एक अशा चार आराेपी

गुजरातमधील महिलांच्या चित्रफिती व्हायरल प्रकरणातील चारही आराेपींना आठ दिवसांची काेठडी
राजकुमार जाेंधळे, लातूर: गुजरातमधील स्त्री रुग्णालयात उपचारादरम्यानच्या तसेच प्रयागराजमधील चित्रफिती व्हायरल करणे सांगली जिल्ह्यातील तीन आणि प्रयागराज येथील एक अशा चार आराेपी तरुणांच्या अंगलट आले आहे. अहमदाबाद पाेलिसांनी त्यांना अटक केल्याने साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, तीन आराेपींना आठ दिवसांची व एकाला पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
अहमदाबाद येथील सायबर क्राईम ब्रॅंचचे पाेलिस उपनिरीक्षक डी. बी. झाला म्हणाले, यातील तीन आराेपी सांगली जिल्ह्यातील असून, त्यापैकी एकजण लातुरात शिक्षणासाठी आला हाेता तर चाैथा आराेपी प्रयागराजमधील आहे. राजकाेटच्या महिला रुग्णालयातील प्रसूतीगृहात वैद्यकीय तपासणी करतानाच्या सीसीटीव्हीतील चित्रफिती हॅक करून साेशल मीडियाच्या प्लॅटफाॅर्मवर विकल्याचा संशय अहमदाबाद पाेलिसांना आहे. त्या अनुषंगाने जेथून-जेथून पाेस्ट व्हायरल केल्या गेल्या, तेथील लाेकेशन ट्रॅक करून तपास यंत्रणेने या चारही आराेपींना जेरबंद केले आहे.
आक्षेपार्ह चित्रफिती विकण्याची शक्कल
साेशल मीडियावर ॲक्टिव्ह राहात, आक्षेपार्ह चित्रफिती पाहत-पाहत त्या इंटरनेटवर विकण्याची शक्कल काही आराेपी लढवतात, असे पाेलिसांनी सांगितले. परंतु, काेणती चित्रफित काेठून कशी व्हायरल केली गेली, ही बाब पाेलिस यंत्रणा ट्रॅक करू शकते. त्याच दिशेने राजकाेटच्या प्रकरणाचा तपास अहमदाबाद सायबर क्राईम सेलच्या पाेलिसांनी करून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणावरून तिघांना ताब्यात घेतले आहे. तर चाैथ्याला प्रयागराजमधून अटक केली. हे चारही आराेपी गुजरातमधील आक्षेपार्ह चित्रीकरण हॅक आणि रेकाॅर्ड करणाऱ्या आराेपींशी कसे संलग्न आहेत, याचाही तपास अहमदाबाद सायबर सेलचे पाेलिस करत असल्याचे लातूर पाेलिसांनी सांगितले.