तेरणावरील चारही बंधारे कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:29+5:302021-05-18T04:20:29+5:30
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील निम्नतेरणा नदीवरील ७ पैकी ४ बंधारे कोरडेठाक पडले आहेत. इतर बंधाऱ्यांत अल्प पाणीसाठा शिल्लक ...
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील निम्नतेरणा नदीवरील ७ पैकी ४ बंधारे कोरडेठाक पडले आहेत. इतर बंधाऱ्यांत अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने यंदा सिंचनाचे क्षेत्र वाढले. याशिवाय, उन्हाळ्याच्या कालावधीत फारशी पाणीटंचाई जाणवली नाही.
गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवरील सर्वच बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले होते. केवळ सोनखेड कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या पाळू वाहून गेल्याने त्यात पाणीसाठा झाला नाही. गतवर्षी या भागात परतीचा जोरदार पाऊस झाला होता. नदीला महापूर आला होता. तेरणा व मांजरा नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहिल्या होत्या. अतिरिक्त पाणी कर्नाटकात सोडून देण्यात आले होते. दोन नद्यांच्या संगमावरील वांजरखेडा, तगरखेडा या बंधाऱ्यांसह औराद, सोनखेड, मदनसुरी, गुंजरगा, लिंबाळा हे उच्चस्तरीय बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे शेती क्षेत्राला चांगला लाभ झाला. सिंचनाचे क्षेत्र वाढले. भाजीपाला, फळबागांचे उत्पादन वाढले. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वच बाजारपेठा बंद आहेत.
परिणामी, शेतकऱ्यांना उत्पादित शेतमालाची विक्री करता आली नाही. त्यामुळे हा शेतमाल शेतातच सडला आहे. दरम्यान, मे महिना निम्मा संपला आहे. याच कालावधीत धरण क्षेत्रातील साठवण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाला आहे. यावर्षी फारशी पाणीटंचाई जाणवली नाही.
बंधाऱ्यातील पाणीसाठा...
औराद प्रकल्पात १४ टक्के, वांजरखेडा- ०, तगरखेडा- १.५ टक्के, साेनखेड- ०, मदनसुरी- ७ टक्के, गुजंरगा- १२ टक्के असा जलसाठा आहे. सर्वाधिक जलसाठा गुंजरगा प्रकल्पात आहे. दरम्यान, साेनखेड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे जलसिंचन शाखा अधिकारी एस. आर. मुळे यांनी सांगितले.
सिंचन क्षेत्र वाढले...
गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने जलसाठा भरपूर झाला. त्यामुळे औराद शहाजानी परिसरात सिंचन क्षेत्रात वाढ झाली. शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळबागांची लागवड केली. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे शेतमाल वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने तसेच बाजारपेठा बंद राहिल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नसल्याचे दिसून येत आहे.