लातुरात सर्व प्रकारच्या सुविधा उभारून स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:24+5:302021-09-26T04:22:24+5:30
सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. लातूर जिल्ह्यातील विनायक ...
सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. लातूर जिल्ह्यातील विनायक प्रकाशराव महामुनी (९५ वा.), कमलकिशोर देशभूषण कंडारकर (१३७ वा.), नितिशा संजय जगताप (१९५ वी.), शुभम वैजनाथ स्वामी (५३३ वा.), पूजा अशोक कदम (५७७ वी.) आणि नीलेश श्रीकांत गायकवाड (६२९ वा.) यांनी यश मिळविले आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या राज्यातील इतर काही विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यानी मिळविलेले यश लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नला झळाळी देणारे आहे. या सर्वांनी घेतलेली मेहनत, जिद्द व चिकाटी युवापिढीसाठी अनुकरणीय आहे.
शैक्षणिक केंद्र म्हणून लातूरचे नाव...
लातूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण परिश्रमातून देशाला अनुकरणीय ठरावा असा पॅटर्न तयार झाला आहे. येथील नेतृत्वानेही शैक्षणिक सुविधा उभारून शिक्षणप्रेमींना प्रोत्साहन दिल्यामुळे आज लातूर जिल्हा शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आला आहे. दरवर्षी हजारो डॉक्टर, इंजिनिअर आणि इतर अधिकारी येथे निर्माण होत आहेत. स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यात यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. येथील शैक्षणिक वातावरण लक्षात घेता, विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उभारण्यावर भर दिला जाईल, असेही पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.