लातूर पोलिसांचे ऑल आउट ऑपरेशन; ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च, ग्रामभेटी
By राजकुमार जोंधळे | Published: December 16, 2022 07:16 PM2022-12-16T19:16:20+5:302022-12-16T19:16:50+5:30
या दरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील ९५ सराईत गुन्हेगारांची झडती घेतली.
लातूर : जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे लातूर पोलिसांकडून ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात येत असून, १५ ते १६ डिसेंबर रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत लातूर पोलिसांकडून जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले, तसेच ३५१ गावांना संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गावात रुट मार्च केला. या कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन उपविभागीय स्तरावर करण्यात आले होते. त्यामध्ये गुन्हेगारावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील ३२ अधिकारी, १२८ पोलिस अंमलदारांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती.
फरार आरोपींना केली अटक...
ऑपरेशनच्या दरम्यान, अवैध शस्त्र जप्ती, अग्निशस्त्रे जप्ती, फरार आरोपींना अटक करणे, लॉज व हाॅटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचे उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहन तपासणे, अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा समावेश होता.
१३३ लॉज, हॉटेलची तपासणी...
अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली, तसेच १३३ हॉटेल, लॉज तपासण्यात आले असून, पोलिसांना चकवा देणाऱ्या २६ आरोपींना वारंट बजावून अटक करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ३८ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८७० संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
९५ सराईत गुन्हेगारांची झडती...
रेकॉर्डवरील ९५ सराईत गुन्हेगारांची झडती घेण्यात आली. गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वत:चे अस्तित्व लपवून दबा धरून बसलेल्या १६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली, तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर २३ गुन्हे दाखल केले. ही मोहीम पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.
३५१ गावात बैठका, संवाद...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामभेटीमध्ये ठाण्याच्या प्रमुखांनी व बीट अंमलदारांनी ३५१ गावांत बैठका घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावात पोलिस दलातर्फे रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.