सर्वच पक्षांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाला विरोध; प्रकाश आंबेडकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 07:00 PM2024-11-11T19:00:03+5:302024-11-11T19:01:11+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण राहणार नाही.
लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेना या सर्वच पक्षांचा विरोध आहे. जनगणना झालेली नाही. त्यामुळे डेटा उपलब्ध नाही, ही सबब पुढे करून नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळणार नाही. ते मिळवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी लातूर येथील सभेत केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण राहणार नाही. कुटुंबातील एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर इतरांना लाभ घेता येणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेला फसवत आहेत. संविधान व लोकशाहीचा मुद्दा त्यांनी मांडला. मात्र संविधानाचा समतेचा मार्गच आरक्षणाच्या माध्यमातून जातो, तो थांबविला जात आहे. मुस्लिम बांधवांवर हल्ले झाले, होत आहेत. वंचित आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. तरीही मौलवी आणि उलेमा वंचितला पाठिंबा देत नाहीत. संधी निघून गेली की पाठ फिरवतात. उद्याच्या पिढीचे अधिकार, मान, सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा पर्याय असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.
तब्येत ठीक नसल्याने त्यांनी दहा मिनिटांत भाषण आटोपते घेतले. यावेळी उमेदवार विनोद खटके, मंजूषाताई निंबाळकर, प्रा. शिवाजीराव देवनाळे, कुमार शिवाजीराव, डॉ. विजय अजनीकर तसेच वंचितचे जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद, रमेश गायकवाड, संतोष सूर्यवंशी, संतोष सोमवंशी, सचिन लामतुरे, सचिन गायकवाड, सुजाता अजनीकर, महंमद शफी, प्रा. युवराज धसवाडीकर, हतिमभाई शेख, बालाजी कांबळे, ॲड. रोहित सोमवंशी, महेंद्र बनसोडे, युवराज जोगी, नितीन गायकवाड, अमोल बनसोडे, आनंद जाधव उपस्थित होते.