पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 01:47 PM2024-04-24T13:47:59+5:302024-04-24T13:48:33+5:30

मनुष्याच्या निसर्गचक्राशी विसंगत वागणूकीने ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचे मत पंचांगकर्त्यांनी नोंदवले आहे

Almanac's big forecast, this year the rainfall will reach the average, but... | पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

- व्ही. एस. कुलकर्णी
उदगीर:
यंदा पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होईल, काही भागांत पावसाचा जोर राहील तर काही भागांत कमी राहील. पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल. पडलेल्या पावसाचे पुनर्भरण करावे लागेल.यासाठी सरकारी नियोजन कमी पडणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

यंदा रोहिणी, मृग नक्षत्रात वारे व वादळ होवून पावसाचे आगमन होईल. नियमित पाऊस २० जून नंतर सुरू होईल.आर्द्रा नक्षत्रात थोडा फार पाऊस होईल. मघा, पूर्वा, उत्तरा, ही नक्षत्रे चांगली वृष्टीकारक असून, हस्त नक्षत्राचे पूर्वार्धात चांगली वृष्टी होईल. पावसाचे मान हे नेहमीच लहरी व खंडवृष्टीकारक झाले आहे. त्यामुळे जेवढा पाऊस पडतो , त्या पाण्याची साठवणूक , पाणी जिरवण्याची योग्य व्यवस्था  याद्वारे पाण्याचे नियोजन जनतेने अवश्य करावे ही काळाची गरज आहे. बेसुमार वृक्षतोड, वाढलेले तापमान, निसर्गचक्राशी विसंगत वागणूक यामुळे ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचा अनुभव  पहायला मिळत आहे. तर कांही वेळा अनपेक्षितपणे अतिवृष्टी होवून  शेतीचे नुकसान होत असल्याचा अंदाज एका पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

३ वर्षांत ५०० मिमी पेक्षा कमी पाऊस
१९८६, १९९२, १९९४ सालीही उदगीर तालुक्यात ५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे नियोजन करून पुनर्भरण करणे काळाची गरज असल्यामुळे हे बंधनकारक करण्याची वेळ आता आली आहे. हे अंदाजही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांनी वर्तवले आहेत.

पुनर्भरण बंधनकारक असावे
उदगीर तालुक्यात गेल्या ३५ वर्षात केवळ पाच सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली .तेंव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षाच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही. उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि. मी. एवढे आहे.१९६५ पासून केवळ १३ वर्षच एक हजार मि. मी. च्या वर पाऊस होऊन  तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि. मी. व १९७२ साली केवळ १७९ मि. मी. एवढाच पाऊस झाला होता. हे दोन्ही वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून प्रसिद्ध होते. 

Web Title: Almanac's big forecast, this year the rainfall will reach the average, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.