ऐच्छिक असूनही प्रेरणा परीक्षेने शिक्षकांचे वाढले टेन्शन!

By हरी मोकाशे | Published: June 9, 2023 07:03 PM2023-06-09T19:03:59+5:302023-06-09T19:04:24+5:30

अधिकाधिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे जि.प.चे आवाहन

Although voluntary, the teacher's tension increased with the motivation test! | ऐच्छिक असूनही प्रेरणा परीक्षेने शिक्षकांचे वाढले टेन्शन!

ऐच्छिक असूनही प्रेरणा परीक्षेने शिक्षकांचे वाढले टेन्शन!

googlenewsNext

लातूर : शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दिंगत व्हावे तसेच विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी क्षमता अधिक दृढ व्हावी म्हणून विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेनुसार शिक्षण प्रेरणा परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश शिक्षकांचे टेन्शन वाढल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७८ शाळा आहेत. इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्यासाठी जिल्हा परिषदेचे ५ हजार ४८४ शिक्षक आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित खासगी शाळांची गुणवत्ता अधिक वाढावी. तसेच विद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा म्हणून विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेनुसार मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

शिक्षकांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असून अधिकाधिक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले आहे. त्यामुळे बहुतांश शिक्षकांचे टेन्शन वाढले असून खासगीत आता कशाला परीक्षा अशी चर्चा शिक्षक करीत आहेत.

चार उत्तरे चुकली की एक गुण वजा...
या परीक्षेचा अभ्यासक्रम हा इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतचा असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जाणार आहेत. प्रश्नपत्रिका सर्वांसाठी सारखीच असणार आहे. संच असणार नाहीत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, जीवशास्त्र व इतिहास आणि भूगोल अशा सहा विषयांवर प्रत्येकी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल. एकूण ३०० गुणांची परीक्षा असणार आहे.

टेन्शन घेऊ नका परीक्षा ऐच्छिक...
शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दिंगत व्हावे. त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी. स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी. विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी या हेतूने ही परीक्षा आहे. ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची आहे. त्यामुळे शिक्षक नकारही दर्शवू शकतात. मात्र, शिक्षकांची सहभागी होणे निश्चितच उपयुक्त आहे. इच्छुक शिक्षकांनी ऑनलाइन नोंदणी करावी.
- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी.

Web Title: Although voluntary, the teacher's tension increased with the motivation test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.