'अमर रहे, अमर रहे';शहीद जवान सुरेश चित्तेला अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:48 PM2020-01-17T14:48:13+5:302020-01-17T14:53:19+5:30
शोकाकुल वातावरणात आलमला येथे लष्करी इतमामात अखेरचा निरोप
आलमला (जि़ लातूर) : अमर रहे, अमर रहे, शहीद जवान सुरेश चित्ते अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय़़़ अशा जयघोषात आणि शोकाकुल वातावरणात शहीद जवान सुरेश गोरख चित्ते यांना शुक्रवारी दुपारी १२़१५ वाजता आलमला (ता़ औसा) येथील रामनाथ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला़ यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती़
औसा तालुक्यातील आलमला येथील सुरेश गोरख चित्ते हे जम्मू- काश्मिरमधील सियाचीन भागात बटालियनमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते़ त्यांची १४ वर्षांपासून लष्करात सेवा झाली होती़ कर्तव्य बजावत असताना ते मंगळवारी शहीद झाले़ शुक्रवारी सकाळी ८़२० वा़ शहीद जवान सुरेश चित्ते यांचे पार्थिव आलमला येथे आणण्यात आले़ गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील नागरिक पहाटेपासूनच रस्त्यावर थांबले होते़ दरम्यान, घरापासून ते रामनाथ शिक्षण संस्थेच्या प्रांगणापर्यंत जवळपास दोन ते अडीच किमी अंतरावर महिलांनी रांगोळी काढली होती़
सकाळी ९ वा़ गावातील मुख्य चौकात श्रध्दांजली वाहण्यात आली़ त्यानंतर अंत्यदर्शनास नागरिकांची रीघ लागली़ ११़३० वा़ पासून फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा निघाली़ यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाती ५० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज होता़ तसेच टाळ- मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदाय होता़ गावातील प्रत्येक महिलांनी शहीद सुरेश चित्ते यांना औक्षण करुन दर्शन घेतले़ रामनाथ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात ही अंत्ययात्रा पोहोचली़ त्यांच्या पार्थिवास त्यांचा लहान बंधू धीरज चित्ते यांनी भडाग्नी दिला़ यावेळी त्यांच्यासोबत शहीद सुरेश चित्ते यांचा ६ वर्षीय मुलगा आदर्श होता़ शोकाकुल वातावरणात शहीद चित्ते यांना अखेरचा निरोप देण्यात आला़ शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे़
यावेळी अहमदनगर येथील लष्कराचे कॅप्टन अजय फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली़ तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने मानवंदना दिली़ यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या शोकसंदेशाचे वाचन मोईज शेख, श्रीशैल्य उटगे यांनी केले तर माजी मंत्री आ़ संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या शोकसंदेशाचे वाचन जि़प़चे समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी केले़ यावेळी आ़ अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती़