लातुरात १८ महिन्यांपासून रूग्णवाहिका चालकांची उपासमार

By आशपाक पठाण | Published: August 17, 2023 07:03 PM2023-08-17T19:03:48+5:302023-08-17T19:04:18+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात खासगी कंपनीकडून चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे

Ambulance drivers not getting salary for 18 months in Latur | लातुरात १८ महिन्यांपासून रूग्णवाहिका चालकांची उपासमार

लातुरात १८ महिन्यांपासून रूग्णवाहिका चालकांची उपासमार

googlenewsNext

लातूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेवर खाजगी कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या चालकांना १८ महिन्यांपासून एक रूपयाचेही वेतन मिळाले नाही. परिणामी, चालकांचा संसार डबघाईला आला आहे. अनेकांनी आता गावाकडची वाट धरावी का, असा विचार सुरू केला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सीईओ, आरोग्य अधिकारी यांना गाऱ्हाणे मांडूनही कोणीच दखल घेत नसल्याची खंत चालक व्यक्त करीत आहेत.

सी.एस.सी.ई गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड या कंपनीकडून लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेवर चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती देत असताना वेतन निश्चित करून त्यांना तसे पत्रही देण्यात आले. तद्नंतर केवळ दोन महिन्यांचे वेतन कंपनीकडून देण्यात आले. रूग्णवाहिका चालक कोणत्याही वेळी सेवा बजावण्यात तत्पर असतात. त्यामुळे इतर वेळेत काही तरी व्यवसाय उद्योग करायला संधीही मिळत नाही. घरगाडा चालविण्यासाठी वेतन हाच एकमेव आधार आहे. त्यातच तब्बल १८ महिन्यांपासून कंपनीकडून वेतन देण्यात आले नसल्याने चालक वैतागले आहेत. उसनवारीवर सुरू असलेला संसाराचा गाडा किती दिवस हाकायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आईला सांभाळणे अवघड झाले...
काही चालक तर इतर तालुका, जिल्ह्यातून येऊन सेवा बजावत आहे, मागील दीड वर्षांपासून घरातून आणून संसार भागविला जात आहे. आता गावाकडची कुटुंबियही कंटाळले आहेत, सामान गुंडाळून या अशा सूचना वडिलांकडून केल्या जात असल्याचे एका चालकाने सांगितले. दवाखान्यापासून माझे गाव जवळपास १०० किलोमीटरवर आहे. गावाकडे आई एकटी राहते, ती सतत आजारी असते, मला तिच्या औषधांचा खर्चही भागविणे कठीण झाले आहे. कंपनीचे लोक फोनही उचलत नाहीत. त्यामुळे आमच्या वेतनाची काळजी कोण घेणार, असा सवाल चालक उपस्थित करीत आहेत.

सीईओ, डिएचओंकडे मांडली व्यथा...
जवळपास १८ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याची माहिती आम्ही सर्व रूग्णवाहिका चालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिली आहे. शिष्टमंडळाने भेटून अडचणी सांगितल्या. सीईओ म्हणाले, मी नवीन आहे, माहिती घेऊन सांगतो. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम सांगणारे वैद्यकीय अधिकारी आश्वसाने देतात. कोण, कुणाला बोलायला तयार नाही. कंपनीच्या वरिष्ठांना प्रशासनाने जाब विचारायला हवा, आम्हाला कोणी जुमानत नसल्याची खंतही चालकांनी लाेकमतशी बोलताना व्यक्त केली.

शासनाकडे निधीची मागणी
रूग्णवाहिका चालक खासगी कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे, कोणाचे १२ तर कोणाचे १५ महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचा आमचा संपर्क नाही. आमच्याकडे आता ४० लाखांच निधी आला आहे, तो निधी कंपनीला वर्ग करणार आहोत. तद्नंतर काही महिन्यांचे वेतन चालकांना मिळेल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी सांगितले.

Web Title: Ambulance drivers not getting salary for 18 months in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.