धाकधूक वाढली! लातूरमध्ये ३५० कोंबड्यांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 04:45 PM2021-01-10T16:45:52+5:302021-01-10T16:56:34+5:30
पुण्याच्या प्रयोगशाळेस वैद्यकीय नमुने पाठवले; अहवालांची प्रतीक्षा
अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथील ३५० गावरान कोंबड्या काल सकाळी अचानक दगावल्या. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली असून, पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. कोंबड्या कशामुळे दगावल्या, हे मात्र अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.
लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील सदाशिव केंद्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर येथून ८०० गावरान कोंबड्यांचे पक्षी आणले होते. त्याचे संगोपन ते करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अचानक त्यातील ३५० कोंबड्यांनी माना टाकल्या. सदरील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रभोदयमुळे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
त्यानंतर लातूर येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कोकणे, जी.बी. पाटील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत काही पक्ष्यांचे नमुने घेऊन पुणे येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.
मृत कोंबड्यांना गाडले
मयत कोंबड्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीत गाडण्यात आले, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला आहे. आजारी व सशक्त कोंबड्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना प्रतिजैविके व औषधोपचार करण्यात आला.
न्यूमोनिया झाल्याचा संशय
कमी व उघड्या जागेमध्ये अधिक कोंबड्या असल्याने आणि थंडीमुळे न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यानंतर कोंबड्या दगावण्याचे कारण स्पष्ट होईल. इतर पक्ष्यांना बाधा होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जाणार आहेत, तसेच शेतकऱ्याने पीपीई किट व मास्कचा वापर करावा, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.
''अहवालानंतर कारण स्पष्ट होईल''
घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे. कमी जागेत अधिक कोंबड्या आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे कोंबड्या दगावल्या, हे आज सांगता येणार नाही. काही नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल.
- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.