अमोलला फसवलं गेलं, त्याच्याशी बोलू द्या! आई-वडिलांनी दिला आत्महत्येचा इशारा
By हणमंत गायकवाड | Published: December 16, 2023 12:30 PM2023-12-16T12:30:46+5:302023-12-16T12:35:01+5:30
लातूर येथील अमोल शिंदे याने संसदेची सुरक्षा भेदून प्रेक्षक कक्षातून सभागृहात त्याच्या साथीदारासह उडी मारल्यामुळे देशात खळबळ उडाली होती.
चाकूर (जि.लातूर) : कोणत्याही विघातक कृत्यात आमचा मुलगा सहभागी आहे, असे आम्हाला वाटत नाही. त्याला गोवले जात आहे. त्याची फसवणूक झाली असावी, असा टाहो अमोलची आई केशरबाई आणि वडील धनराज यांनी फोडला. आमच्या मुलाशी बोलणं करू द्या, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
लातूर येथील अमोल शिंदे याने संसदेची सुरक्षा भेदून प्रेक्षक कक्षातून सभागृहात त्याच्या साथीदारासह उडी मारल्यामुळे देशात खळबळ उडाली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणेचा चौकशीचा ससेमिरा अमोलच्या गावापर्यंत, कुटुंबापर्यंत पोहोचला. ही घटना घडल्यापासून सर्वांच्या नजरा आमच्या दिशेने आहेत. पोलिसांचा ससेमिरा आमच्यामागे आहे. आम्हाला आमचे लेकरू भेटलं नाही, तर आमच्यावर आत्महत्येचीच वेळ येईल, असा इशारा अमोल शिंदे याच्या आई-वडिलांनी दिला.
अमोल शिंदे याला दिल्लीत अटक झाल्यानंतर त्याचे मूळ गाव लातूरच्या चाकूरजवळील झरी (बु.) येथे अनेकजण चौकशी करीत आहेत. तपास यंत्रणा माहिती घेत आहे. आई-वडिलांचे जबाब नोंदविले आहेत. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या आई-वडिलांनी शुक्रवारी आपली हतबलता पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले, आमचा मुलगा अमोल हा सैन्यामध्ये जाण्यासाठी तयारी करीत होता. धावण्याच्या स्पर्धेत तो अनेकदा प्रथम आलेला आहे. आमची परिस्थिती जेमतेम आहे. नोकरीसाठी त्याचे प्रयत्न सुरूच होते. त्याला या प्रकरणात फसवलं गेलं आहे, असेही त्यांनी सांगितले.