मावलगावात मोहोरांनी बहरली आमराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:42+5:302021-01-13T04:48:42+5:30
अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार ...
अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विविध रोपांची लागवड केली. सध्या येथील अमराई मोहोराने बहरली आहे.
अहमदपूर तालुक्यातील मावलगाव हे १ हजार २७४ लोकसंख्येचे गाव असून, ग्रामपंचायतीने शासन योजना राबविण्याबरोबरच सरपंचांनी स्वखर्चातून गाव विकासासाठी मदत केली आहे. गावातील अबालवृध्दांसाठी उद्यान, ज्येष्ठांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे, गावातील संपूर्ण घरांना एकच रंग, धोबीघाट, ओपन जीम, प्रत्येक कुटुंबाच्या नळास मीटर, गावात विविध ठिकाणी हात धुण्यासाठी वॉश बेशीन, मोफत दळण, गावात बंदिस्त गटारी, प्रत्येक कुटुंबात शौचालयाचा वापर, सीसीटीव्ही कॅमेरे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रोत्साहापर मदत असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविले जात आहेत. याशिवाय एक गाव - एक स्मशानभूमी, आठ - अ रजिस्टरला कुटुंबप्रमुख म्हणून महिलांचे नाव, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, गावातील चौकाचौकात एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. गावात तीन ठिकाणी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शोषखड्ड्याच्या माध्यमातून सांडपाण्याचे १०० टक्के व्यवस्थापन करीत डासमुक्त गाव करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा जमा केला जातो. कचरा जमा करण्यासाठी २५० कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले आहे. युवकांसाठी मोफत वाचनालय अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सरपंच रुक्मिण संपते, उपसरपंच नीलावती केंद्रे, ग्रामसेवक सचिन तावरे, चेअरमन रमेश कासले, मल्लिकार्जुन स्वामी, रंगनाथ पाटील, रामचंद्र केंद्रे, गणपतराव संपते, विद्याबाई राचमले, अनिल कदम, सतीश कासले, अशोक भदाडे आदी परिश्रम घेत आहेत.
कॅरिबॅगमुक्तीकडे वाटचाल...
शासनाच्या कॅरिबॅगमुक्त उपक्रमात सहभागी होऊन गाव कॅरिबॅगमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गावात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, काही कामे स्वखर्चाने केल्याचे सरपंच रुक्मिण संपते यांनी सांगितले.
पर्यावरणाचे रक्षण...
मावलगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गावात फुले, फळांची व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात आंबा १५०, नारळ ८०, चिकू २००, पेरु १५०, जांभूळ २००, चिंच १०० तसेच फुलांची २ हजार, तर इतर झाडे २,५०० अशी झाडे लावण्यात आली आहेत. सध्या आंब्याची झाडे मोहोराने बहरली आहेत. यंदा ग्रामस्थांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.