शेतात शेळ्या चारणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वीज कोसळून मृत्यू
By हरी मोकाशे | Published: April 27, 2023 06:23 PM2023-04-27T18:23:54+5:302023-04-27T18:24:57+5:30
निलंगा तालुक्यात तीन बैल, एका म्हैस देखील वीज कोसळल्याने दगावली
निलंगा (जि. लातूर) : शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह गुरुवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. वीज पडून मुबारकपूर तांडा येथील एक ११ वर्षीय मुलगी दगावली आहे. तसेच तालुक्यासह लातूर जिल्ह्यात वीज पडून सहा जनावरे दगावली आहेत.
आरुषा नथुराम राठोड (११, रा. मुबारकपूर तांडा, ता. निलंगा) असे मयत मुलीचे नाव आहे. निलंग्यापासून चार किमी अंतरावर मुबारकपूर तांडा आहे. गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, आरुषा नथुराम राठोड ही मुलगी शेतात शेळ्या चारत होती. तेव्हा वीज पडल्याने ती दगावल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच निलंगा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पंचनामा केला.
दरम्यान, उदगीर, जळकोट येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. तसेच काहींच्या घरावरील पत्रे हवेत भिरभिरत होती. बुधवारी पहाटे जळकोट तालुक्यातील सिंदगी येथील केशव पाटील दळवे यांच्या दोन म्हशींवर वीज पडून त्या दगावल्या. निलंगा तालुक्यातील होसूर येथील शेतकरी बालाजी बिरादार यांची बैलजोडी, तुगाव हालसी येथील धुळप्पा बावगे यांच्या शेतातील बैल वीज पडल्यामुळे मृत्यूमुखी पडला. तसेच तगरखेडा येथील शेतकरी दयानंद गिरी यांच्या शेतातील म्हैस वीज पडल्याने जागीच ठार झाली. या पावसामुळे आंबा आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे.