शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लातूर इथं सहायक अभियंता जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: February 6, 2023 10:05 PM2023-02-06T22:05:39+5:302023-02-06T22:06:23+5:30
शेतीपंपाला वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी
लातूर - शेतकऱ्याचा विद्युतपंप सुरू ठेवण्यासाठी २५ हजारांची मागणी करून, तडजाेडीअंती १० हजारांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या हरंगुळ येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साेमवारी रंगेहाथ पकडले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
सूत्रांनी सांगितले, लातूर शहरालगत असलेल्या हरंगुळ येथील महावितरण कार्यालयात सहायक अभियंता (वर्ग - २) माधवराव सुधाकरराव बिराजदार (वय ४०) हा सध्या कार्यरत असून, त्याने नागझरी गावठाण येथील डीपीवरून तक्रारदारासह इतर दाेघा शेतकऱ्यांना शेतीचा विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी आणि गावठाण डीपीचा शेतीपंपाला वीजपुरवठा सुरू करावा, या कामासाठी पहिल्यांदा २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तडजाेड झाल्यानंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रार केली.
या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर लातूर शहरातील बार्शी मार्गावर असलेल्या एका बारनजीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साेमवारी दुपारी सापळा लावला. यावेळी ठरल्याप्रमाणे महावितरणचे सहायक अभियंता माधवराव बिराजदार याला दहा हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पंडित रेजितवाड, पाेलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या पथकाने केली.