नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत
By संदीप शिंदे | Updated: August 2, 2024 18:06 IST2024-08-02T18:05:13+5:302024-08-02T18:06:02+5:30
नदी, नाल्यास पाणी आल्याने मगरीचा वावर वाढल्याने ब्रह्मवाडीत भीतीचे वातावरण

नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत
अहमदपूर : तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील शेतकरी शिवदास घुगे यांच्या शेतात नऊ फूट लांबीची मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तासाभराच्या प्रयत्नानंतर मगरीस पकडण्यास यश आले आहे. दरम्यान, पावसामुळे नदी, नाल्यास पाणी आल्याने मगर पाण्याबाहेर आल्याचा अंदाज आहे.
ब्रह्मवाडी येथील शेतकरी शिवदास घुगे यांनी शेतात मगर दिसताच भ्रमणध्वनीवरून वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय अहमदपूर येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ब्रह्मवाडी येथे जाऊन शेतकरी घुगे यांच्या शेतात मगर असल्याची खात्री केली. वरिष्ठ अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शानाखाली पथक तयार करण्यात आले. वनपरिमंडळ अधिकारी गोंविदराव माळी, राम केसाळे, जी.बी. काळे, वनरक्षक भीमराव गडकर, विश्वनाथ होनराव, राठोड, भाऊसाहेब अंबुलगेकर, मीरा बोंबले, सर्पमित्र सिद्धार्थ काळे, आशिष कलुरे, उद्धव देगलूरे, योगेश तेलंगे, कान्हा पांचाळ या कर्मचाऱ्यांनी मगर रेस्क्यू केली. पशुधन विकास अधिकारी डॉ. सुयोग येरोळे यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केली.
मगरीला पुणे येथे पाठविण्यात येणार...
सदरील मगर ही नर जातीची असून, सध्या पाऊस सुरु असल्याने नदी, नाले वाहत आहेत. त्यातूनच आली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मगरीचे वय अंदाजे १० ते ११ वर्षे आहे. वजन १५० किलो व मगर नऊ फूट लांबीची आहे. मगरीला पुणे येथील रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.