सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला; चार जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: December 6, 2023 05:23 AM2023-12-06T05:23:14+5:302023-12-06T05:23:26+5:30
लातूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते.
लातूर : एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या नाशिक आणि लातूर येथील चार जणांना मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोखंडी तलवार, बताईसह अटक केली आहे.
लातूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यातील आराेपींची माहिती संकलित करत हाेते. दरम्यान, त्यांची माग काढत असताना काही जण जुन्या गुळमार्केट परिसरातील वाहन पार्किंगमध्ये संशयास्पद फिरत असल्याची माहिती खबऱ्याने माहिती दिली. ते सराफाची साेन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत आहेत. अशी टीप मिळाल्याने पाेलिस पथक जुने गुळमार्केट पार्किंग येथे धडकले.
मिळालेल्या माहितीवरून पार्किंग परिसरात संशयास्पद थांबलेल्यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्यांनी संतोष अशोक पटेकर (२६), नीलेश ऊर्फ भारत ऊर्फ नाना बापू क्षीरसागर (२५, दाेघेही रा. आम्रपालीनगर, कॅनल रोड, नाशिक), ज्ञानेश्वर शरद पोतदार (३१, रा. खोरीगल्ली, लातूर) आणि अक्षय लक्ष्मण महामुनी (२८, रा. लातूर) अशी नावे सांगितली. यावेळी बॅगची झडती घेतली असता त्यात लोखंडी तलवार, बतई, धारदार विळा आढळून आला.
याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. प्रवीण राठोड, सपोउपनि. संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.