लातूर जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात साडेसहा कोटी रुपयांची वाढ
By हरी मोकाशे | Published: March 11, 2024 06:38 PM2024-03-11T18:38:37+5:302024-03-11T18:38:49+5:30
व्याजातून मिळणारे उत्पन्न आता १३ कोटी ६७ लाख
लातूर : शासनाकडून मिळणाऱ्या निधीची प्रशासकांनी बँकेत योग्य पध्दतीने गुंतवणूक केल्याने व्याजाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेस व्याजातून १३ कोटी ६७ लाख रुपये मिळत आहेत. लेखा व वित्त विभागाच्या सुयोग्य नियोजनामुळे ही वाढ झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना अधिक प्रमाणात निधी मिळणार आहे.
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेस विविध योजना, विकास कामांसाठी केंद्र सरकार, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीकडूनही स्थानिक विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. जिल्हा परिषदेतील पंचायत, आरोग्य, बांधकाम, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, लघु पाटबंधारे, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन अशा विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीचा वापर जिल्हा परिषदेस दोन वर्षे करता येतो.
१२० कोटी रुपयांची गुंतवणूक...
शासन व जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीचा तात्काळ वापर होत नाही. तो जिल्हा परिषदेच्या बँक खात्यावर पडून राहतो. योजना अथवा विकास कामे पूर्ण झाल्यानंतर तपासणीनंतर बिल अदा करण्यात येते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लागतो. या बाबी बारकाईने तपासून जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाने तात्पुरत्या स्वरुपात बँकेत जिल्हा परिषदेच्या नावावर १२० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे व्याजाचे उत्पन्न वाढले आहे.
अनावश्यक खाते केले बंद...
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे आणि पंचायत समित्यांचे विविध बँकेत खाते आहेत. त्यावर काही रक्कम पडून होती. लेखा व वित्त विभागाने सर्व खात्यांची आणि रकमेची माहिती घेतली. तेव्हा बरीच रक्कम वापराविना नियमित खात्यावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनावश्यक खाते बंद करुन ती रक्कम वापराच्या खात्यावर वर्ग करुन घेतली. बँक खात्याचे एकत्रीकरण केले आहे.
यापूर्वी ७ कोटी ३२ लाख व्याज...
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेस व्याजातून ७ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज मिळाले होते. खाते एकत्रिकरणामुळे यंदा त्यात ६ कोटी ५० लाखांची भर पडली असून आता १३ कोटी ६७ लाख रुपये व्याज मिळत आहे. या रकमेचा लाभ जिल्ह्यातील विकास कामांसाठी होणार आहे.
नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी उपयोग...
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या बँक खात्यावर निधी पडून असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे बँक खात्यांचे एकत्रिकरण केले. खात्यावरील निधीची बँकेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नावाने गुंतवणूक केली. त्यामुळे व्याजाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आता १३ कोटी ६७ लाख रुपये व्याजरुपाने उत्पन्न मिळणार आहे.
- आप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.