अन् बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले! लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलातील घटना
By हरी मोकाशे | Published: October 10, 2023 11:41 PM2023-10-10T23:41:24+5:302023-10-10T23:41:43+5:30
माजी सैनिकाच्या सीपीआरने चमत्कार
हरी मोकाशे/ महेश पाळणे, लातूर: व्यायाम करताना अचानकपणे हृदय बंद पडण्याच्या घटना अनेकदा घडतात. तशीच घटना लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी घडली. नेहमीप्रमाणे धावणारा एक ३९ वर्षीय व्यक्ती अचानकपणे कोसळला आणि हृदय बंद पडले. तेव्हा तेथील माजी सैनिकाने धाव घेऊन हाताने सीपीआर दिला. त्यामुळे बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले. हे पाहून मित्रांसह कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
चाकूर तालुक्यातील सुगाव येथील शितल बंडू मेकले (३९) यांच्यावर हा प्रसंग ओढावला होता. शितल मेकले हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. शरीराचे वजन वाढल्याने ते कमी करावे म्हणून महिनाभरापासून जिल्हा क्रीडा संकुलावर दररोज सायंकाळी व्यायामासाठी येतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ५ वा. ते आपले मित्र तुकाराम भालके यांच्यासोबत व्यायाम करीत होते. दरम्यान, त्यांनी धावण्याच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर वेळ लावून स्प्रिंट मारण्याचे ठरविले. स्प्रिंट मारताना त्यांनी जवळपास ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. शेवटच्या घटकात मात्र त्यांना चक्कर आली आणि काही क्षणात ते जमिनीवर कोसळले.
लागलीच माजी सैनिक सिद्धेश्वर चाटे यांनी मेकले यांना हाताने छातीवर सीपीआर दिला, तर सोबतच्या मित्राने तोंडाने कृत्रिम श्वास दिला. तसेच समूहातील विष्णू सोडगीर, परमेश्वर बिराजदार, सतीश मुंडे, धीरज काटे, शेख व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून मेकले यांच्या पायातील शूज काढले तसेच अंगातील शर्ट काढून हवा दिली.
दरम्यान त्यांचे मित्र तुकाराम भालके आणि सचिन हांडे यांनी रुग्णवाहिका बोलावली व खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असले तरी प्रकृती धोक्याबाहेर असल्याची डॉ. मनोज कदम यांनी सांगितले.
दीड मिनिट हृदय बंद...
धावताना अचानकपणे चक्कर आली जमिनीवर कोसळलो. डोळे उघडे असल्याने सर्व दिसत होते. मात्र हालचाल पूर्णपणे बंद पडली होती. तेव्हा माजी सैनिक चाटे हे देवदूताप्रमाणे धावले. त्यांनी हाताने सीपीआर देत तर इतर मित्रांनी त्यांना साथ देत माझे प्राण वाचविले. जवळपास माझे हृदय दीड मिनिट बंद पडले होते.
- शितल मेकले.
रिहॅबलिटेशन केंद्र नावालाच...
जिल्हा क्रीडा संकुलात रिहॅबलिटेशन सेंटर आहे. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेसह प्रथमोपचारही मिळत नाहीत. त्यामुळे हे सेंटर नावालाच आहे. क्रीडा संकुलात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे केंद्र परिपूर्ण असावे, अशी मागणी खेळाडू व नागरिकांत होत आहे.
सीपीआरमुळे बचावला जीव...
चाटे यांनी वेळेवर सीपीआर दिल्याने मेकले यांचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू झाले. त्यामुळे सीपीआरच्या प्रशिक्षणाची गरज आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास दिलेल्या भेटीदरम्यान समाजात सीपीआरच्या प्रशिक्षणाची गरजही बोलून दाखवली होती.