लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये प्रथमच ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया; मोफत सुविधेचा गरजूंना लाभ
By हरी मोकाशे | Updated: December 5, 2024 18:12 IST2024-12-05T18:10:42+5:302024-12-05T18:12:43+5:30
महात्मा फुले जनआरोग्यतून मोफत सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या कुटुंबियांना आनंद

लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये प्रथमच ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया; मोफत सुविधेचा गरजूंना लाभ
लातूर : थोडेसेही घरगुती काम केले की अचानक धाप लागून छातीत वेदना होत असलेली ५३ वर्षीय महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली होती. इसीजी, ॲन्जीओग्राफीनंतर दोन रक्तवाहिन्या बंद पडल्याचे निदर्शनास आल्याने तज्ज्ञांनी ॲजीओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ही यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णाच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे. विशेषत: अतिविशेषोपचार रुग्णालयात अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया झाली आहे.
लातूर तालुक्यातील खाडगाव येथील एक ५३ वर्षीय महिलेला सतत धाप लागून छातीत वेदना होत असल्याने कुटुंबियांनी उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. आजाराच्या निदानासाठी इसीजी करण्यात आली. त्यात ॲन्जीओग्राफीची आवश्यकता असल्याने अतिविशेषोपचार रुग्णालयात २७ नोव्हेंबर राेजी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, दोन रक्तवाहिन्या बंद असल्याचे निदर्शनास आल्याने ॲन्जीओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी हृदयरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष कवठाळे यांनी दोन स्टेन्त बसवून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना डॉक्टरांच्या चमूने मदत केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, डॉ. मेघराज चावडा, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. शैलेश चव्हाण, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. चंद्रशेखर गौरे, डॉ. संगिता आगळे, डॉ. हाके, अधिसेविका लक्ष्मी आपटे, अमृता पोहरे, बाबासाहेब काटे आदी उपस्थित होते.
गरजू रुग्णांना लाभ होणार...
अतिविशेषोपचार रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्यासाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. सुनील होळीकर यांचे वर्षभरापासून प्रयत्न सुुरु होते. त्यास यश आले आहे. ॲन्जिओग्राफी आणि ॲन्जीओप्लास्टी मोफत सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्याचा जिल्ह्याबरोबर नजिकच्या जिल्ह्यातील गरजू रुग्णांना लाभ होणार आहे.
- डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता.
लवकरच अन्य विभाग सुरु...
अतिविशेषोपचार रुग्णालयात कॅथलॅब सुरु झाल्याने गाेरगरीब रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार होणार आहेत. उर्वरित सहा- सात विभाग लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.
- डॉ. सुनील होळीकर, विशेष कार्य अधिकारी.
सीमा भागातील रुग्णांची सोय...
छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई येथे शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याने येथील हृदयरुग्णांना तिथे पाठवावे लागत होते. मात्र, आता येथेच सुविधा उपलब्ध होत असल्याने त्याचा पाच- सहा जिल्ह्यातील रुग्णांना लाभ होणार आहे.
- डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधीक्षक.