लंपी स्किन डिसीजच्या प्रादुर्भावामुळे लातूरचा जनावराचा बाजार बंद राहणार
By हणमंत गायकवाड | Published: September 8, 2022 02:29 PM2022-09-08T14:29:39+5:302022-09-08T14:31:40+5:30
ज्या गावांमध्ये लंपी स्किन डीसीजचे पशुधन आहेत. त्या गावाच्या दहा किलोमीटर अंतर परिसरात होणारे जनावरांचे बाजार, पशुप्रदर्शन तसेच जत्रा बंद राहणार
लातूर:जिल्ह्यातील अनेक गावातील पशुधनांमध्ये लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव वाढला आहे. पशुधनाच्या त्वचेवर गाठी येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुधन पालक त्रस्त झाले असून पशुधनाला वाचविण्यासाठी पशू आरोग्य दवाखान्यामध्ये उपचारासाठी पशुधनाला आणले जात आहे. दरम्यान लंपी स्किन डीसीजच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लातूरात शनिवारी होणारा जनावराचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या गावांमध्ये लंपी स्किन डीसीजचे पशुधन आहेत. त्या गावाच्या दहा किलोमीटर अंतर परिसरात होणारे जनावरांचे बाजार, पशुप्रदर्शन तसेच जत्रा बंद ठेवाव्यात. पुढील आदेश येईपर्यंत बाजार सुरू करू नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी दिली आहेत. त्यानुसार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शनिवारी भरणारा जनवाराचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश बाजार समितीच्या सचिवांनी दिले आहेत. जिल्ह्यात दहा ते पंधरा लाख पशुधनाची संख्या आहे. त्यात शेळी वर्ग,गाय वर्ग आदी पशुधनाचा समावेश आहे. यातील किती पशुधनाला लंपी स्कीन डीसीजची लागण झाली आहे. त्याचा सर्वे पशुधन विभागाकडून केला जात आहे.