संतापजनक ! अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्याने तीन मृतदेह २६ तास शवागारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 07:34 PM2020-09-17T19:34:39+5:302020-09-17T19:36:05+5:30
नागरिकांनी अंत्यविधी करण्यास विरोध करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले.
लातूर : कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने तीन मृतदेह २६ तास शवागारात ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी स्मशानभूमीत जागा उपलब्ध झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनामुळेमंगळवारी शहरातील तिघांचा मृत्यू झाला होता. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. मात्र, पाऊस झाल्याने स्मशानभूमीत जेसीबी फसली. त्यामुळे तेथे अंत्यविधी न करता तेथून दुसऱ्या स्मशानभूमीत सदर मृतदेह नेण्यात आले. मात्र, तेथील नागरिकांनी अंत्यविधी करण्यास विरोध करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. त्यामुळे मंगळवारपासून बुधवारी दुपारपर्यंत तिन्ही मृतदेह शवागारात ठेवले गेले. दरम्यानच्या काळात मृतांच्या नातेवाईकांनी प्रयत्न केले; परंतु अंत्यविधीला जागा उपलब्ध होऊ शकली नव्हती. अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सिद्धेश्वर येथील स्मशानभूमीत जागा उपलब्ध झाल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
संतप्त नागरिकांचे महापालिकेसमोर आंदोलन
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी बुधवारी महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन केले. महापौर व आयुक्तांना निवेदन देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे व महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. आंदोलनात ओमप्रकाश झुरुळे, बालाजी पिंपळे, शरणाप्पा अंबुलगे, नितीन मोहनाळे, बाळासाहेब महाजन, कमलाकर डोके-पाटील, सुनील ताडमाडगे, विपीन हालिंगे, नीलेश कुरडे, किशोर रोडगे आदींचा समावेश होता.