मुरूड-लातूर रस्त्यावर पुन्हा अपघात; ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली, १९ प्रवासी जखमी
By संदीप शिंदे | Published: December 7, 2023 05:20 PM2023-12-07T17:20:44+5:302023-12-07T17:20:57+5:30
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १९ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत
बोरगाव काळे ( लातूर ) : उदगीर येथून पुणेकडे ४२ प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स एमएच २४ एयु ७०७० बुधवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास मुरुड-लातूर रस्त्यावरील पुलावरून कोसळली. यात जीवितहानी झाली नसून, १९ पेक्षा अधिक प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी रात्री उदगीर येथील ४२ प्रवासी घेऊन पुण्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स साखरापाटी नजीक आली असताना पुलाच्या जवळ असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने थेट पुलावरून खाली उलटली. त्यात १९ पेक्षा अधिक प्रवाशी किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी रुग्णवाहिकेद्वारे जखमी प्रवाशांना लातूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी अडथळा येत होता. यावेळी घटनास्थळी गातेगाव पोलीस हजर झाल्याने सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ज्या प्रवाशांना खरचटले सुद्धा नाही अशा प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅव्हल्सने पुण्याकडे सुखरूप पाठविण्यात आले.
मुरूड -लातूर रस्त्यावर कायम अपघात...
मुरूड लातूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बारा नंबर पाटी ते मुरूड अकोला रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र पुलाचे काम करण्यात आले नाही. रस्ता रुंदीकरण झाले तरी या मार्गावरील पूल अरुंद आहेत. त्यामुळे पुढे पूल असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने पुलाजवळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पुलाजवळ गतिरोधक तरीही अपघात...
बारा नंबर ते मुरूड अकोला दरम्यान चौपदरीकरण करण्यात आले आहे. तर पुलाचे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे रस्त्यावरील पुलावर अनेक अपघात झाले आहेत. पुढे पूल असल्याचे वाहधारकांच्या लक्षात येत नसल्याने थेट वाहने पुलावरून खाली कोसळत आहे. त्यामुळे मागील महिन्यात पुलाजवळ गतिरोधक बसविण्यात आले आहेत. तर पुलावर अपघात होऊन अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.