लातूरमधून आणखी एक सराईत गुन्हेगार तडीपार; एमपीडीए कायद्यानुसार कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: April 2, 2024 07:11 PM2024-04-02T19:11:03+5:302024-04-02T19:11:39+5:30
आतापर्यंत पाेलिसांनी जिल्ह्यात सात जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे
लातूर : सार्वजनिक शांततेला बाधा पाेहचविणाऱ्या झोपडपट्टीदादा, गुंड, हातभट्टीवाले यांच्याविरुद्ध लातूर पोलिसांनी धडक कारवाई माेहीम हाती घेतली आहे. एमपीडीए कायद्यानुसार आणखी एकावर तडीपारीची कारवाई केली असून, त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. आतापर्यंत पाेलिसांनी जिल्ह्यात सात जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे.
लातूर जिल्ह्यातील एमपीडीए कायद्यानुसार केलेली सातवी कारवाई सार्वजनिक शांततेला धोका असल्याने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार औसा आणि विवेकानंद चाैक ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत औसा येथील मोहसीन हबीब शेख उर्फ बाबा पठाण (वय २८) याच्याविरुद्ध कारवाई केली. मोहसीन हबीब शेख उर्फ बाबा पठाण याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई डीवायएसपी सुनील गोसावी, औशाचे पाेनि. सुनील रेजितवाड, विवेकानंदचे चाैक ठाण्याचे पोनि. वैजनाथ मुंडे, स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, सपोनि. प्रशांत लोंढे, मुबाज सय्यद, रामकिशन गुट्टे, तुमकुटे, शिवाजी गुरव, महारुद्र डिगे, बालाजी चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविला. आराेपीला माधव बिलापट्टे, जमीर शेख, राजाभाऊ मस्के, संतोष खांडेकर यांनी ताब्यात घेत, त्याची कारागृहात रवानगी केली.
जिल्ह्यातील ठाण्यात गंभीर ११ गुन्हे दाखल...
सराईत गुन्हेगार मोहसीन हबीब शेख उर्फ बाबा पठाण याच्याविरुद्ध लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या ११ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध, मालमत्ता चोरी, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे, विनयभंग आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.