लातूर जिल्ह्यातील आणखीन एक मध्यम प्रकल्प काेरडा; ५०१ गावांमध्ये ठणठणाट!
By हरी मोकाशे | Published: May 30, 2024 04:42 PM2024-05-30T16:42:40+5:302024-05-30T16:43:06+5:30
उन्हामुळे टंचाई वाढली : ३९८ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
लातूर : वैशाख वणव्यामुळे होरपळ वाढली आहे. त्याचबरोबर जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये टंचाईची दाहकता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ५०१ गावांना टंचाईचे चटके बसत आहे. त्यापैकी ३९८ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत. तसेच जलस्त्रोतही कोरडे पडत आहेत. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले होते. दरम्यान आता आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने पाणीटंचाई वाढली आहे.
चार प्रकल्पांत उपयुक्त पाणी शून्य...
जिल्ह्यातील तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेेत. त्यामुळे तिथे उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. वाढत्या उन्हामुळे आता शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तिथेही उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. सध्या रेणापूर प्रकल्पात ०.५७० दलघमी, देवर्जन- ०.३९९, साकोळ- ०.४९० आणि मसलगा मध्यम प्रकल्पात १.८२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. चार मध्यम प्रकल्पात एकूण ३.२८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.
चार प्रकल्पांमध्ये २.६९ टक्के साठा...
प्रकल्प - पाणी (टक्के)
तावरजा - ००
व्हटी - ००
रेणापूर - १.७०
तिरु - ००
देवर्जन - ३.७४
साकोळ - ४.४८
घरणी - ००
मसलगा - १३.४२
एकूण - २.६९
लघु तलावांमध्ये ६.८६ टक्के साठा...
लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात एकूण १३४ तलाव आहेत. त्यात सध्या २१.५७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तो ६.८६ टक्के आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या उन्हामुळे तलावातील साठ्यात झपाट्याने घट होत आहे.
टंचाई निवारणासाठी ४८५ अधिग्रहणे...
सध्या जिल्ह्यातील ४२२ गावे आणि ७९ वाड्या अशा एकूण ५०१ गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टंचाई निवारणासाठी ७३४ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर २७ गावांचे प्रस्ताव वगळले आहेत. ४५८ गावांचे ५९९ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले. त्यातील ३९८ गावांसाठी ४८५ अधिग्रहणे मंजूर करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरु आहे.