चिंता वाढली! लातूर जिल्ह्याची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत दीड मीटरने खालावली
By हरी मोकाशे | Published: February 15, 2024 04:33 PM2024-02-15T16:33:56+5:302024-02-15T16:35:37+5:30
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला.
लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, जिल्ह्यास पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीअखेरीस निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी ही १.५५ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, चिंता अधिक वाढली आहे.
गत पावसाळ्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. विशेषत: पावसाळ्यात पावसाने दमदार बरसात केली नाही. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला. दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो, असा गेल्या तीन- चार वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे परतीच्या पावसावर मदार होती. मात्र, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. त्याचबरोबर ओढे- नाले खळाळले नाहीत. त्यामुळे मध्यम, लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर जमिनीत पाणीही मुरले नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पर्जन्यमान झाले.
सहा तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...
तालुका - भूजल पातळीतील घट
अहमदपूर - -१.४५
औसा - -४.५७
चाकूर - -१.५९
निलंगा - -२.३०
शिरुर अनं. - -४.४७
रेणापूर - -१.६६
उदगीर - ०.४४
लातूर - ०.१२
जळकोट - ०.२६
देवणी - ०.५६
एकूण - -१.५५
औश्याची सर्वाधिक पाणीपातळी घटली...
भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी अखेरीस जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -१.५५ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी औसा तालुक्याची कमी झाली असून ती -४.५९ मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. -४.४७ मीटर अशी घट झाली आहे.
चार तालुक्यांची स्थिती मध्यम...
जिल्ह्यातील दहापैकी चार तालुक्यांच्या पाणी पातळीची स्थिती बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्यात लातूर, उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित सहा तालुक्यातील भूजलपातळी खालावली आहे.
सहा गावांनी केली टँकरची मागणी...
जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरअखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबर त्या वाढत आहेत. सध्या औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब. गावाने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करुन पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.