लातूर न्यायालयातील युक्तिवाद आणि आराेपी पाेलिस काेठडीत; वकील म्हणाले...
By राजकुमार जोंधळे | Published: June 26, 2024 05:17 AM2024-06-26T05:17:34+5:302024-06-26T05:17:56+5:30
नीट प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेतील दुसरा आराेपी संजय जाधव यास मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले.
लातूर: नीट प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेतील दुसरा आराेपी संजय जाधव यास मंगळवारी दुपारी लातूरन्यायालयात हजर केले. दाेन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायाधीश एम. एन. चव्हाण यांनी आराेपीला दि. २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. दरम्यान, आराेपी जलीलखाॅ पठाण यासही २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. दरम्यान, प्रकरण चर्चेतील असल्याने न्यायालयातील युक्तिवादाकडे सर्वांचेच लक्ष हाेते.
आराेपीचे वकील म्हणाले, न्यायालयीन काेठडी द्या...
नीट प्रकरणात अटकेत असलेला शिक्षक आराेपी संजय जाधव याच्या बाजूने ॲड. व्ही. एस. बाेराडे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, संजय जाधव हे दाेन दिवसांपासून पाेलिसांच्या ताब्यात आहेत. चाैकशी झाली असून, त्यांना न्यायालयीन काेठडी द्यावी, अशी न्यायालयाला विनंती आहे. याच आशयाचा युक्तिवाद आराेपी पठाण याचे वकील ॲड. अजित पाटील यांनी पहिल्या दिवशी केला हाेता. पाेलिसांची चाैकशी आधीच झाली असल्याने कमीतकमी काेठडी द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.
सरकारी वकील म्हणाले...
संजय जाधव यास पाेलिस काेठडी मिळावी, यासाठी सरकारी वकील सुवर्णा चव्हाण-राठाेड यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. आराेपी जाधव याची चाैकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे. या प्रकरणातील सूत्रधार इरण्णा काेनगलवार आणि दिल्लीतील गंगाधर याला अटक व्हायची आहे. या प्रकरणाचे धागेदाेरे कुठपर्यंत आहेत. आराेपीचे आणखी काेणा-काेणासाेबत संबंध आहेत, याचा तपास व्हायचा आहे. यासाठी न्यायालयाने दहा दिवसांची पाेलिस काेठडी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायाधीश एम. एन. चव्हाण यांनी संजय जाधव याला दि. २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
आराेपींची चाैफेर चाैकशी...
नीटच्या तयारीसाठी लाखाे विद्यार्थी मेहनत घेतात. अनेकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक पैलू तपासून आराेपींची चाैफेर चाैकशी सुरू आहे. सत्य समाेर आणण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थी-पालकांनी निश्चिंत रहावे. गुन्हेगारांना तपास यंत्रणा साेडणार नाही आणि निरापराधांना त्रास हाेणार नाही, असे जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे म्हणाले.