काका पवारांच्या मल्लविद्येची किमया: दुसऱ्या शिष्याने पटकाविली महाराष्ट्र केसरीची गदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:33 PM2023-01-14T21:33:43+5:302023-01-14T21:34:46+5:30
लातूरच्या सुपूत्राची मल्लविद्येची किमया महाराष्ट्र केसरीत चमकली !
- महेश पाळणे
लातूर : तब्बल अकरा वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कुस्ती कलेच्या माध्यमातून ठसा उमटविलेले लातूरचे सुपुत्र काका पवार यांनी कुस्ती खेळानंतरही प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपली किमया सुरुच ठेवली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरीत अर्जुनवीर काका पवार यांच्या पठ्ठ्यांनी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावित उपविजेतेपद आपल्याकडे खेचून आणले. अशी किमया काकांच्या पठ्ठ्यांनी दुसऱ्यांदा केली आहे. त्यामुळे लातूरची कुस्ती प्रतिभावान आहे, हे प्रशिक्षणातून काकांनी दाखवून दिले आहे.
मुळचे लातूर तालुक्यातील साई या गावचे रहिवासी असलेले काका पवार यांनी कुस्ती खेळात तर आपली छाप सोडली आहेच यासोबतच पुण्यातील कात्रज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या माध्यमातून नवोदित मल्लांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. यामाध्यमातून त्यांच्या पठ्ठ्यांनी अनेक फड गाजविले आहेत. शालेय स्पर्धेपासून विद्यापीठ स्पर्धा, रेल्वे, पोलिस व संघटनेच्या स्पर्धेत अधिकाधिक पदके त्यांच्याच तालमीत दाखल होतात. २०१९ मध्येही पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद व उपविजेतेपद काकांच्या पठ्ठ्यांना मिळाले होते. नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने विजेतेपद तर औसा तालुक्यातील टाका येथील शैलेश शेळकेने उपविजेतेपद पटकाविले होते. यंदाच्या वर्षातही दुसऱ्यांदा अशीच किमया काकांच्या मल्लांनी करुन दाखविली आहे. पुण्याच्या मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत शनिवारी पार पडली. यात पुणे जिल्ह्यातील खेड येथील शिवराज राक्षे याने मानाची गदा पटकाविली तर उपविजेतेपदी सोलापूरचा मल्ल महेंद्र गायकवाड राहिला. एकंदरीत २०२३ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत काका पवार यांची मल्लविद्या श्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सर्वाधिक पदके काकांच्या तालमीत...
प्रतिवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रत्येक वजनीगटात काकांच्या मल्लांचा दबदबा असतोच. २०१९ मध्ये २० पदके मिळाली होती. त्यानंतर कोराेनामुळे दोन वर्षे स्पर्धा झाली नाही. २०२२ साली १४ पदके तर यंदाच्या वर्षांत १३ पदके घेऊन सर्वाधिक पदके मिळविण्याचा बहूमानही काकांच्या तालमीला मिळाला आहे. यात सात सुवर्ण, तीन राैप्य व तीन कास्यंपदकांचा समावेश आहे.
थार, ट्रॅक्टरसह सात दुचाकी जावा...
महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून काकांच्या तालमीत सात दुचाकी जावासह एक थार व एक ट्रॅक्टर मल्लांनी पारितोषिक स्वरुपात मिळाले आहे. महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेला विजेतेपदाच्या गदासह थार ही चारचाकी मिळाली असून, उपविजेत्या महिंद्र गायकवाडला ट्रॅक्टर मिळाले आहे. यासह विविध वजनी गटातील विजेत्यांना सात दुचाकी जावा मिळाल्या आहेत.
मल्लांच्या मेहनतीचे चीज झाले...
आतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात आलेला प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी धडपडत असतो. आमचे केवळ त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन असते. बाकी मेहनत मल्ल स्वत: करीत असतात. यंदाच्या वर्षांत दुसऱ्यांदा मानाची गदा मिळाल्याचा आनंद आहे. मल्लांच्या कष्टाचे चीज झाले असल्याचेही अर्जुनवीर काका पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.