बोरफळमध्ये एकाची सशस्त्र दहशत, तिघांवर केला हल्ला, तरुणांनी पकडले!
By राजकुमार जोंधळे | Published: July 23, 2023 11:56 PM2023-07-23T23:56:21+5:302023-07-23T23:56:35+5:30
एक गंभीर, दाेघे किरकाेळ जखमी
राजकुमार जाेंधळे, औसा (जि. लातूर): गेले दोन दिवसांपासून औसा-तुळजापूर महामार्गावर हातात काेयता घेत दहशत पसरविणाऱ्याला औसा पोलिसांनी गावातील तरुणांच्या मदतीने ताब्यात घेतले. नेताजी विश्वनाथ मांजरे (वय ४५) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून, त्याने तिघांवर हल्ला केला असून, यात एक गंभीर तर दाेघे किरकाेळ जखमी झाले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, बोरफळ येथील नेताजी मांजरे हा दोन्ही हातात धारदार शस्त्र घेत औसा ते तुळजापूर महामार्गावर दहशत पसरवत होता. त्याने शनिवारी सायंकाळी शिवली मोडवरून लातूरकडे निघालेल्या कार चालकाला शिवीगाळ केली. तू आम्हाला का शिवीगाळ केली? अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या संतोष बाबासाहेब कानमोडे (वय ३८) याच्यावर त्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी पुन्हा नेताजी मांजरे हा हातात काेयता घेत बोरफळ येथे दहशत पसरवत होता. या प्रकाराने नागरिकांसह प्रवासी त्रस्त झाले होते. दरम्यान, गावातील युवकांच्या मदतीने त्याला पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले. हा थरार औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर जवळपास तासभर सुरू हाेता.
याबाबात औसा पाेलिस ठाण्यात पीयूष राजाभाऊ कश्यप यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, सपोनी प्रशांत लोंढे, दिनेश गवळी, अशोक कदम, महारुद्र डिगे, राहुल डांगे, शिवरुद्र होगाडे, शिवरुद्र वाडकर उपस्थित होते.
अन् जीव धोक्यात घालून त्यास पकडले...
औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सशस्त्र दहशत पसरविणाऱ्याला पकडण्यासाठी गावातील काही तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात रविवारी यश आले आहे. शिवसेना ओबीसी विभागाचे तालुकाप्रमुख बालाजी राठोड यांच्यावरही त्याने हल्ला केला असून, ते जखमी झाले आहेत. मात्र, त्यांचे सहकारी हर्ष चव्हाण, ॲड. राहुल राठोड, ओमकेत आडे यांच्यासह गावकऱ्यांनी प्रयत्न करून त्याला पकडले.