लातूर रोडला सशस्त्र दरोडा; शस्त्राचा धाक दाखवून तीन-चार घरे लुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:07 PM2021-12-29T20:07:46+5:302021-12-29T20:08:44+5:30
चाकूचा धाक दाखवून तीन घरे लुटली; चाकुर तालुक्यात भितीचे वातावरण
चाकूर (जि.लातूर) : चाकूर तालुक्यातील लातूररोड येथे सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून तीन घरे लुटली आहेत. यावेळी सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख २१ हजाराचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी अन्य दोन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक जागे झाल्याने तेथून ते पसार झाले.
लातूर रोड येथील बाबूराव कलाल यांच्या घरी रात्री १.०५ मिनिटाला दरोडेखोरांनी मुख्य प्रवेशद्वार टामीच्या सह्याने तोडले. कलाल यांना चाहूल लागली. दरोडेखोर तेथून पसार झाले. तेथून लक्ष्मीकांत राठी यांच्या घरासमोर दबा देऊन बसले. घराचे मागचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. राठी यांच्या पत्नी जागी झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारचे मधूकरराव मुंडे घराबाहेर आले. दरोडेखोरांनी दगडफेक केली. राजेश्वर पाटील यांच्या घरातील सोन्याची दागिने, रोख २६ हजार रुपये घेतले. दरोडेखोरांनी पाटील यांच्या बेडरुममध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखविला. चार वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून एक दरोडेखोर तेथेच थांबला. पाटील, त्यांची पत्नी, एका लहान मुलीस चाकूचा दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावर नेले. तेथे राजकुमार लिंबुटे यांना हाक मारुन घराचे दार काढण्यास भाग पाडले. पाटील यांच्या मागे शस्त्रधारी लोक पाहताच लिंबूटे यांनी दार बंद करण्याचा प्रयत्न केला तो असफल ठरला. लिंबूटे त्यांची पत्नी सर्वांना धाक दाखवून एका जागेवर गप्प बसण्यास भाग पाडले. त्यांना चाकूचा धाक दाखवून सोने,चांदीचे दागिणे व ९६ हजार रुपये रोख असा एवज लंपास केला.
लिंबुटे यांना चाकूचा धाक दाखवून बस्वराज सगरे यांचे घराचे दार काढण्यास भाग पाडले. तेथून सोने,चांदीचे दागिने रोख ४९ हजार रुपये लुटले. लक्षण धाकपाडे यांच्या छतावरुन घरात प्रवेश केला. टामीच्या सह्याने दार तोडले. हॉलमध्ये लक्ष्मण यांचे वडील नारायण यांना काठीने मारहाण केली. दरोडेखोर आल्याची चाहूल लागल्याने लक्ष्मण यांनी पोलिस ठाण्यात फोन केला. तेव्हा त्यांची पत्नी सोन्याचे दागिने लपवून ठेवत होती. खिडकीतून एक दरोडेखोर हा प्रकार पाहत होता. अखेर लक्ष्मण यांच्या खोलीचे दार तोडून दरोडेखोरांनी दागिने व रोख रक्कम १ लाख ४८ हजार असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.